Ratnagiri- सावधान!, परशुराम घाटातील 'गॅबियन वॉल' घसरतेय!, ग्रामस्थ पुन्हा भीतीच्या छायेत
By संदीप बांद्रे | Updated: June 3, 2025 17:49 IST2025-06-03T17:45:32+5:302025-06-03T17:49:31+5:30
कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह

Ratnagiri- सावधान!, परशुराम घाटातील 'गॅबियन वॉल' घसरतेय!, ग्रामस्थ पुन्हा भीतीच्या छायेत
संदीप बांद्रे
चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण अंतर्गत परशुराम घाटातील धोकादायक दरडींच्या सुरक्षिततेच्या उपायोजनांच्या दृष्टीने लोखंडी जाळी व गॅबियन वॉल उभारण्याचे काम सुरू आहे. मात्र, गॅबियन वॉल घसरण्याचा प्रकार समोर आला आहे. यावरून गॅबियन उभारणीचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे समोर आल्याने या कामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
गेल्या दोन वर्षांपासून परशुराम घाटातील धोकादायक स्थिती कायम चर्चेत राहिली आहे. या घाटात एका बाजूला २२ मीटर उंचीच्या दरडीचा भाग असल्याने या ठिकाणी पावसाळ्यात नियमित घडणाऱ्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर धोकादायक दरडीच्या ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून लोखंडी जाळी बसवली जात आहे. हे लोखंडी जाळी बसवण्याचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. तर दुसरीकडे गेल्या पावसात कोसळलेल्या संरक्षण भिंतीच्या बाजूने गॅबियन वॉल उभारण्याचे काम देखील वेगाने सुरू आहे.
काही दिवसांपूर्वी येथे मान्सूनपूर्व पावसाने जोर धरल्याने ही कामे थांबली होती. आता पुन्हा या कामाने वेग घेतला असला, तरी गॅबियन वॉल घसरत असल्याचे मंगळवारी समोर आल्याने पुन्हा एकदा परशुरामवासीयांना व महामार्गावरील वाहतूकदारांना धडकी भरली आहे. या घाटातील निकृष्ट कामाचा नमुना समोर आला असल्याने या कामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित राहत असून पुन्हा एकदा सावधान, परशुराम घाटातील 'गॅबियन वॉल' घसतेय, असे म्हणायची वेळ आली आहे.