रत्नागिरीतील आरे-वारे समुद्रात चौघे बुडाले; एकाचा मृत्यू, तिघे बचावले 

By अरुण आडिवरेकर | Published: May 27, 2024 11:43 AM2024-05-27T11:43:37+5:302024-05-27T11:43:58+5:30

रत्नागिरी : तालुक्यातील आरे-वारे समुद्रकिनारी मौजमजा करताना रत्नागिरीतील गाडेकर कुटुंबीयातील चौघेजण समुद्रात बुडाल्याची घटना रविवारी सायंकाळी ६:३० वाजता घडली. ...

Four drowned in Aare Vare sea in Ratnagiri, One died, three survived  | रत्नागिरीतील आरे-वारे समुद्रात चौघे बुडाले; एकाचा मृत्यू, तिघे बचावले 

रत्नागिरीतील आरे-वारे समुद्रात चौघे बुडाले; एकाचा मृत्यू, तिघे बचावले 

रत्नागिरी : तालुक्यातील आरे-वारे समुद्रकिनारी मौजमजा करताना रत्नागिरीतील गाडेकर कुटुंबीयातील चौघेजण समुद्रात बुडाल्याची घटना रविवारी सायंकाळी ६:३० वाजता घडली. यामध्ये तिघांना वाचवण्यात स्थानिकांसह नातेवाइकांना यश आले असून, पंकज रामा गाडेकर (३३, रा. पुणे, मूळ कारवांचीवाडी रत्नागिरी) यांचा बुडून मृत्यू झाला. 

नोकरीनिमित्त पुणे येथे स्थायिक असलेले पंकज रामा गाडेकर हे पत्नी मयुरी गाडेकर यांच्यासह रत्नागिरीतील कारवांचीवाडी येथील आपल्या गावी सुट्टीसाठी आले होते. गाडेकर कुटुंब रविवारी दुपारी संकष्टी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळे येथे देवदर्शनासाठी गेले होते. त्यानंतर गणपतीपुळे येथील समुद्र धोकादायक असल्याने तिथे न जाता गाडेकर कुटुंबीय आरे- वारे समुद्रकिनारी आले. गाडेकर कुटुंबातील पंकज रामा गाडेकर, मयुरी पंकज गाडेकर, बालाजी रामा गाडेकर व त्यांचा एक भाचा असे चौघेजण पोहण्यासाठी समुद्रात उतरले होते. कमी पाण्यात मौजमजा सुरू असतानाच अचानक आलेल्या लाटेने पंकज गाडेकर लाटेबरोबर आत ओढले गेले. 

लाटे बरोबर ते आत जात असल्याचे लक्षात येताच त्यांची पत्नी मयुरी व भाऊ बालाजी हे त्यांना वाचवण्यासाठी पुढे गेले. मात्र, तेही पाण्यात बुडू लागताच किनाऱ्यावर असलेल्या मुले, महिलांनी आरडाओरड केल्यानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत चौघांनाही पाण्याबाहेर काढले. परंतु, पंकज गाडेकर हे खोल पाण्यात बुडाल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक होती. स्थानिकांनी तात्काळ १०८ रुग्णवाहिकेला संपर्क केला. परंतु, १०८ रुग्णवाहिका तासाभराने घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर चौघांनाही जिल्हा शासकीय रुग्णालय आणण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर पंकज रामा गाडेकर यांना मृत घोषित करण्यात आले.

या घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक नितीन ढेरे, पोलिस अंमलदार जोशी, शिवगण यांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन मृतदेहाचा पंचनामा केला. त्यानंतर रात्री उशिरा आकस्मिक मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.

Web Title: Four drowned in Aare Vare sea in Ratnagiri, One died, three survived 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.