CoronaVirus Lockdown : औद्योगिक व वाणिज्यिक ग्राहकांच्या बिलातील स्थिर आकार ३ महिन्यांसाठी स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 11:34 IST2020-04-13T11:28:35+5:302020-04-13T11:34:01+5:30
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यात २२ मार्च ते ३० एप्रिल २०२० पर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. या लॉकडाऊनमुळे राज्यातील बहुतेक सर्वच मोठे उद्योग आणि वाणिज्यिक ग्राहकांनी आपला व्यवसाय बंद केलेला आहे. या लॉकडाऊनच्या कालावधीत बंद असलेल्या औद्योगिक आणि वाणिज्यिक ग्राहकांच्या वीजबिलातील स्थिर आकार/ मागणी आकार पुढील ३ महिन्यांसाठी स्थगित करण्यात येत असून त्यानंतर येणाऱ्या बिलात कोणताही दंड न आकारता तो समाविष्ट करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांनी नागपूर येथे दिली.

CoronaVirus Lockdown : औद्योगिक व वाणिज्यिक ग्राहकांच्या बिलातील स्थिर आकार ३ महिन्यांसाठी स्थगित
रत्नागिरी : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यात २२ मार्च ते ३० एप्रिल २०२० पर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. या लॉकडाऊनमुळे राज्यातील बहुतेक सर्वच मोठे उद्योग आणि वाणिज्यिक ग्राहकांनी आपला व्यवसाय बंद केलेला आहे. या लॉकडाऊनच्या कालावधीत बंद असलेल्या औद्योगिक आणि वाणिज्यिक ग्राहकांच्या वीजबिलातील स्थिर आकार/ मागणी आकार पुढील ३ महिन्यांसाठी स्थगित करण्यात येत असून त्यानंतर येणाऱ्या बिलात कोणताही दंड न आकारता तो समाविष्ट करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी नागपूर येथे दिली.
लॉकडाऊनच्या कालावधीतील वीजबिलातील स्थिर आकार/मागणी आकार माफ करण्यात यावा, अशी मागणी अनेक औद्योगिक तसेच वाणिज्यिक ग्राहकांनी केली होती. ही मागणी ग्राह्य धरून ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांनी या ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे.
एएमआरमार्फत ज्या ग्राहकांचे मीटर वाचन उपलब्ध असल्यास अशा ग्राहकांना त्यांच्या मीटरवरील नोंदीनुसार वास्तविक बील देण्यात येईल. जर ग्राहकांचे मीटर रीडिंग उपलब्ध नसल्यास त्या ग्राहकांना सरासरी वीजबिल आकारण्यात येईल. मे-२०२० मध्ये एएमआरमार्फत बिलाची माहिती उपलब्ध झाल्यानंतर वास्तविक मीटर रीडिंगनुसार वीजबिल आकारण्यात येईल.
लॉकडाऊनच्या कालावधीत कुठल्याही प्रकारचा वीजवापर झाला नसल्याचे समजून लॉकडाऊनच्या कालावधीतील शून्य वापराचे वीजबिल देण्यात येणार असल्याचे सांगून ऊर्जामंत्री ना. डॉ. राऊत म्हणाले की, अशा ग्राहकांचे मीटर रीडिंग मिळाल्यानंतर या ग्राहकांना लॉकडाऊनच्या कालावधीत नोंदविलेल्या वास्तविक वापराचे वीजबिल देण्यात येईल. तसेच लोड फॅक्टर / पीएफ सारखे सर्व प्रोत्साहन/सवलती उपलब्ध असतील.
मार्च-२०२० महिन्याच्या वीजवापराच्या बिलाचे देयक दिनांक १५ मे असणार आहे. तर एप्रिल-२०२० महिन्याच्या वीजवापराच्या बिलाचे देयक दिनांक ३१ मे-२०२० राहील. या दोन्ही महिन्यांच्या बिलावर नियमाप्रमाणे अनुदान लागू असेल.
महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार मीटर वाचन होणार नाही. बिलिंग सरासरी मासिक वापरावर राहणार असून ग्राहकांना वेबसाईट किंवा मोबाईल अॅपद्वारे सेल्फ रीडिंग (स्वत: घेतलेले) घेऊन वीजबिल भरता येईल. ज्या ग्राहकांनी स्वत:हून मीटर रीडिंग सादर केले आहे, त्या ग्राहकांना सरासरीनुसार वीज आकारणी केली जाणार आहे. पुढील काळात ज्यावेळी मीटर रीडिंग घेतले जाईल, त्यावेळी ग्राहकांना त्या महिन्यांचे सरासरी बिल आकारले जाईल, असेही ऊर्जामंत्र्यांनी सांगितले.
तात्काळ वीजबिल भरणा, गो-ग्रीन सवलत, डीजिटल पेमेंटबाबतच्या सवलती ग्राहकांना नियमाप्रमाणे लागू असून मार्च महिन्याचे बिल भरण्यास दि. १५ मे २०२० पर्यंत सवलत देण्यात आली आहे. तर एप्रिल-२०२० चे वीजबिल भरण्यासाठी दि.३१ मे-२०२० ची अंतिम तारीख दिली आहे. ग्राहकांनी आपले वीजबिल वेळेवर भरून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहनही ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले आहे.