जगबुडी नदीत कार कोसळून मुंबईच्या पाच जणांचा मृत्यू, वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना मुलीचा अंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 06:40 IST2025-05-20T06:40:45+5:302025-05-20T06:40:57+5:30
देवरुखचे काशीराम चाळके यांच्या अंत्यविधीसाठी त्यांची मिरारोडची कन्या मिताली, जावई विवेक आणि नातू निहार हे रविवारी रात्री कारने निघाले होते.

जगबुडी नदीत कार कोसळून मुंबईच्या पाच जणांचा मृत्यू, वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना मुलीचा अंत
खेड (जि. रत्नागिरी) : मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे नाका येथे जगबुडी नदीच्या पुलावरून सुमारे १०० फूट खोल कार कोसळून दोन कुटुंबांतील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, अन्य दोघे गंभीर जखमी आहेत. दोन्ही कुटुंबे मुंबईहून देवरूखला अंत्यविधीसाठी जात असताना सोमवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास हा अपघात झाला.
मेधा परमेश पराडकर (५०), सौरभ परमेश पराडकर (२२), मिताली विवेक मोरे (४५), निहार विवेक मोरे (१९), श्रेयस राजेंद्र सावंत (२३) अशी मृतांची नावे आहेत. कार चालवणाऱ्या परमेश पराडकर (५२) आणि विवेक श्रीराम मोरे (४९) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
देवरुखचे काशीराम चाळके यांच्या अंत्यविधीसाठी त्यांची मिरारोडची कन्या मिताली, जावई विवेक आणि नातू निहार हे रविवारी रात्री कारने निघाले होते.
चालकाला डुलकी?
दुहेरी मार्ग असल्यामुळे जगबुडी नदीवर येणारा व जाणारा असे दोन पूल आहेत. या पुलांच्यामध्ये असलेल्या छोट्या जागेतून कार नदीच्या पात्रात कोसळली. येथील कठडा यापूर्वीच तुटलेला आहे. चालकाला डुलकी आल्यामुळे हा अपघात झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
स्थानिक धावले मदतीला
मारे यांचे नालासोपाऱ्यातील नातलग परमेश पराडकर, पत्नी मेघा, मुलगा सौरव आणि श्रेयस सावंत हेही त्यांच्या सोबत होते. परमेश कार चालवत होते. पहाटे खेड-भरणे येथे पुलाचा कठडा तोडून त्यांची कार नदीच्या कोरड्या पात्रात कोसळली.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मदतकार्य सुरू केले. कार पात्रातून काढून जखमींना हाॅस्पीटलमध्ये दाखल केले. मात्र, पाच जणांचा मृत्यू झाला होता. या अपघातात विवेक मोरे आणि परमेश पराडकर जखमी झाले.