रत्नागिरी जिल्ह्यात आजपासून मासेमारी हंगाम, वादळामुळे चिंता
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 14:19 IST2025-08-01T14:18:33+5:302025-08-01T14:19:06+5:30
काेकण किनारपट्टीवर वादळी हवामान असल्याने मच्छीमारांच्या चिंतेत भर पडली

संग्रहित छाया
रत्नागिरी : दोन महिन्यांच्या बंदीनंतर शुक्रवार, १ ऑगस्टपासून जिल्ह्यातील सागरी मत्स्य व्यवसायात मासेमारी हंगामाला पुन्हा सुरुवात होणार आहे. नव्या मासेमारी हंगामासाठी मच्छीमार सज्ज झाले आहेत. मात्र, सध्या काेकण किनारपट्टीवर वादळी हवामान असल्याने मच्छीमारांच्या चिंतेत भर पडली आहे.
सागरी क्षेत्रात १ जून ते ३१ जुलै या कालावधीत मासेमारी करण्यास बंदी घालण्यात आली होती. हा काळ माशांचा प्रजनन काळ असतो. त्यामुळे मत्स्य उत्पादन वाढीसाठी हा कालावधी महत्त्वाचा असतो. या काळात मासेमारीसाठी नौकांवर बंदी घालण्यात येते. सरकारने घातलेली मासेमारी बंदी ३१ जुलैला संपली असून, १ ऑगस्टपासून नव्या मासेमारी हंगामाला सुरुवात हाेणार आहे.
मासेमारी बंदी १ ऑगस्ट रोजी उठविली जाणार असली तरी सध्या काेकण किनारपट्टीवर वादळी वारे वाहत आहेत. समुद्र खवळलेला असल्याने पहिल्याच दिवशी मासेमारी सुरू हाेण्याची शक्यता कमी आहे. हवामानातील बदल लक्षात घेऊनच मच्छीमार मासेमारीला सुरुवात करण्याची शक्यता आहे.
मासेमारी थाेडी उशिरा
वादळी हवामानामुळे १ ऑगस्टपासून मासेमारीला सुरुवात हाेण्याबाबत साशंकता आहे. समुद्र निवळल्यानंतर ५ ते ६ ऑगस्टदरम्यान मासेमारीला सुरुवात हाेण्याची शक्यता आहे. मात्र, काही मच्छीमार नारळी पाैर्णिमेपासूनच मासेमारीला सुरुवात करतील, असा अंदाज आहे.