'एलईडी'ची लावली गळी, रत्नागिरीची नौका मालवणच्या जाळी; मत्स्य विभागाच्या कारवाईने अवैध मासेमारीचे धाबे दणाणले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 14:15 IST2026-04-01T14:14:50+5:302026-04-01T14:15:07+5:30
'भुवनेश्वरी' नौका जप्त

'एलईडी'ची लावली गळी, रत्नागिरीची नौका मालवणच्या जाळी; मत्स्य विभागाच्या कारवाईने अवैध मासेमारीचे धाबे दणाणले
मालवण : सिंधुदुर्गच्या सागरी हद्दीत अनधिकृतपणे 'एलईडी' प्रकाशझोताच्या साहाय्याने मासेमारी करणाऱ्या रत्नागिरीतील 'भुवनेश्वरी' या नौकेवर मत्स्यव्यवसाय विभागाने ३० मार्च रोजी रात्री धडक कारवाई केली. ही नौका जप्त करण्यात आली असून ती मालवण-सर्जेकोट बंदरात आणून अवरुद्ध करण्यात आली आहे.
मिळालेली माहिती अशी की, देवबाग-मालवण समोरील समुद्रात सुमारे ११ ते १२ सागरी मैल अंतरावर रत्नागिरी जिल्ह्यातील महेश मनोहर आयरे यांच्या मालकीची 'भुवनेश्वरी' (IND-MH-४-MM-३७३८) ही नौका एलईडी लाइट्स लावून मासेमारी करताना गस्ती पथकाला आढळली. महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ (सुधारित २०२१) अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. यावेळी नौकेवर तांडेलसह दोन खलाशी होते.
मत्स्यव्यवसाय सिंधुदुर्गचे सहाय्यक आयुक्त सागर कुवेसकर यांच्या मार्गदर्शनाखाली परवाना अधिकारी व अंमलबजावणी अधिकाऱ्यांच्या पथकाने ही मोहीम राबवली. या कारवाईचा सविस्तर अहवाल सादर झाल्यानंतर सुनावणी घेऊन नौकामालकावर मोठी दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे मत्स्य विभागाकडून सांगण्यात आले.
मत्स्यव्यवसाय मंत्र्यांचे कडक आदेश
राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी अवैध मासेमारीविरोधात कठोर भूमिका घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार, सागरी संपत्तीचा ऱ्हास करणाऱ्या एलईडी मासेमारीला चाप लावण्यासाठी विभाग आता 'ॲक्शन मोड'मध्ये आला आहे.
गस्ती पथकाची कामगिरी
रात्रीच्या वेळी समुद्रात गस्त घालत असताना ही नौका रंगेहात पकडण्यात आली. या मोहिमेत सागरी सुरक्षा पर्यवेक्षक मायबा, परब, जाधव, जुवाटकर आणि सावजी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
कारवाईचा इशारा
"एलईडी मासेमारीमुळे पारंपरिक मच्छिमारांचे मोठे नुकसान होत आहे. यापुढेही अशा प्रकारे अनधिकृत मासेमारी करणाऱ्या नौका आढळल्यास त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करून मोठा दंड वसूल केला जाईल," असा इशारा सहायक आयुक्त सागर कुवेसकर यांनी दिला आहे.