रत्नागिरीत गोळीबार, मोबाईल व्यावसायिक गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2020 22:30 IST2020-02-21T22:29:50+5:302020-02-21T22:30:13+5:30
शहराच्या आठवडा बाजार येथे असलेल्या नॅशनल मोबाईल या दुकानाचे मालक मनोहर ढेकणे रात्री ९ वाजल्यानंतर आपले दुकान बंद करून बंदर रोड येथे असलेल्या आपल्या घराकडे जात होते.

रत्नागिरीत गोळीबार, मोबाईल व्यावसायिक गंभीर जखमी
रत्नागिरी : दुकान बंद करून घरी जाणा-या शहरातील मोबाईल व्यावसायिक मनोहर ढेकणे यांच्यावर दोघांनी गोळीबार केल्याची घटना शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली. त्यांना तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.
शहराच्या आठवडा बाजार येथे असलेल्या नॅशनल मोबाईल या दुकानाचे मालक मनोहर ढेकणे रात्री ९ वाजल्यानंतर आपले दुकान बंद करून बंदर रोड येथे असलेल्या आपल्या घराकडे जात होते. त्याचवेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी एकाने त्यांच्यावर गोळीबार केला. नेमक्या किती गोळ्या झाडल्या गेल्या, याची माहिती उपलब्ध झाली नसली तरी एक गोळी ढेकणे यांच्या पोटात शिरली आहे. थोड्या लांबच्या अंतरावरून गोळी मारण्यात आल्यामुळे ती पोटातून आरपार गेली नाही. ती पोटामध्येच राहिली.
रक्ताच्या थारोळ्यात ढेकणे खाली पडले. आसपासच्या लोकांनी त्यांना तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्यावर हल्ला करणारे दुचाकीस्वार लगेचच पळून गेले. रत्नागिरीचे उपविभागीय अधिकारी गणेश इंगळे यांच्यासह रत्नागिरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.