चिपळुणातील उड्डाणपुलासाठी जानेवारी २०२६चा मुहूर्त!, गर्डर चढविण्याचे काम युद्धपातळीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 12:16 IST2025-03-31T12:15:40+5:302025-03-31T12:16:06+5:30

जुन्या पिअर कॅप तोडण्याचे काम पूर्ण

Efforts to complete the work of the flyover at Chiplun on the Mumbai Goa National Highway before January 2026 | चिपळुणातील उड्डाणपुलासाठी जानेवारी २०२६चा मुहूर्त!, गर्डर चढविण्याचे काम युद्धपातळीवर

चिपळुणातील उड्डाणपुलासाठी जानेवारी २०२६चा मुहूर्त!, गर्डर चढविण्याचे काम युद्धपातळीवर

चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बहादूरशेखनाका येथे उड्डाणपुलाच्या कामाला गती आली असून, जानेवारी २०२६ पूर्वी हे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सध्या जुने पिअर तोडण्याचे काम पूर्ण झाले आहे. आता नवीन पिअर कॅप उभारण्याच्या कामाला वेग आला आहे.

पेढे-परशुराम ते खेरशेत या ३४ किलोमीटर दरम्यान चौपदरीकरणातील चिपळूण टप्प्यात बहादूरशेख नाका ते प्रांत कार्यालयापर्यंत उड्डाणपूल उभारण्यात येत आहे. बहादूरशेखनाका येथून या पुलाचे काम पावसाळ्यात सुरू केले. मात्र, १६ ऑक्टोबर २०२३ रोजी या पुलाचा काही भाग कोसळल्यानंतर या कामातील काही त्रुटी प्राथमिकदृष्ट्या समोर आल्या. त्यानंतर पुलाचा आराखडा बदलण्यात आला.

सध्या पूल उभारणीत ४० मीटरच्या गाळ्यांचे अंतर कमी करून ते आता २० मीटरवर ठेवले आहे. त्यासाठी तिथे अतिरिक्त पिअर उभारण्यात आले आहेत. पिअर कॅप उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, एकूण ९५ पिअर कॅपपैकी अर्ध्याहून अधिक पिअर कॅपचे काम पूर्ण केले आहे. त्यासाठी तीन टीम काम करत आहेत.

आता उर्वरित पिअर कॅपवर गर्डर चढविण्यासाठी दोन क्रेन मागविण्यात आले असून, त्याआधारे महिनाभरात ३२ गर्डर चढविण्यात आले. अजूनही उर्वरित कामासाठी किमान नऊ महिन्यांचा कालावधी लागणार असल्याने जानेवारी २०२६ पर्यंत हे काम पूर्ण होईल, असे राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून सांगण्यात आले आहे.

पॉवरहाऊस ब्लॅक स्पॉटच्या वाटेवर

चिपळूण हद्दीतील पाग पाॅवरहाऊस येथील चौकातून ये-जा करताना मोठी कसरत करावी लागते. आतापर्यंत येथे अनेक अपघात झाले असून, त्यात काहींना आपले प्राणही गमवावे लागले होते. सततच्या अपघाताच्या घटनांमुळे हा चौक भविष्यात ‘ब्लॅक स्पॉट’ म्हणून ओळखला जाण्याची भीती आहे.

  • पुलाची लांबी १,८४० मीटर
  • रुंदी ४५ मीटर
  • ४६ पिलर पुलासाठी उभारण्यात आले असून, हा पूल कोकणातील महामार्गावरील सर्वाधिक लांबीचा ठरला आहे.

Web Title: Efforts to complete the work of the flyover at Chiplun on the Mumbai Goa National Highway before January 2026

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.