कोरोना काळात जिल्ह्यात झाली ४०४१ बेरोजगारांची नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2020 03:41 PM2020-12-21T15:41:14+5:302020-12-21T15:45:00+5:30

RatnagiriNews- कौशल्य विकासातून तरूणांना विविध प्रशिक्षणाच्या माध्यमातून कौशल्य वाढवून रोजगार संधी मिळवून दिली जात आहे. मात्र अलिकडे बेरोजगारांची संख्या वाढली असून, कोरोना काळात तब्बल ४०४१ जणांनी नावनोंदणी केली आहे.

During Corona period 4041 unemployed were registered in the district | कोरोना काळात जिल्ह्यात झाली ४०४१ बेरोजगारांची नोंदणी

कोरोना काळात जिल्ह्यात झाली ४०४१ बेरोजगारांची नोंदणी

Next
ठळक मुद्देकोरोना काळात जिल्ह्यात झाली ४०४१ बेरोजगारांची नोंदणीकौशल्य विकास कार्यक्रमातून १०९४ जणांपैकी ५०५ जणांना रोजगार संधी

शोभना कांबळे

रत्नागिरी : पूर्वी बेरोजगारांची नावनोंदणी करून त्यांना रोजगार मिळवून देणाऱ्या सेवायोजन कार्यालयाचे नाव तिसऱ्यांदा बदलून आता कौशल्य विकास, रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र असे करण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौशल्य विकासातून तरूणांना रोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी हा कार्यक्रम सुरू केला. त्यामुळे ज्यांच्यात कुठल्याही व्यवसायाचे कौशल्य नाही किंवा अपुऱ्या प्रमाणात आहे, अशांना विविध प्रशिक्षणाच्या माध्यमातून कौशल्य वाढवून रोजगार संधी मिळवून दिली जात आहे. मात्र अलिकडे बेरोजगारांची संख्या वाढली असून, कोरोना काळात तब्बल ४०४१ जणांनी नावनोंदणी केली आहे.

येथील कौशल्य विकास, रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्रातर्फे लॉकडाऊन काळात खासगी कंपन्यांचे ऑनलाईन रोजगार मेळावे घेण्यात आले. कौशल्य विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून २०१७ सालापासून १,०९४ बेरोजगारांना प्रशिक्षण मिळाले. त्यातून ४२४ जणांना रोजगार मिळाला तर ८१ जणांनी स्वयंरोजगार सुरू केले.

रोजगार मेळाव्यांना जेमतेम प्रतिसाद

रत्नागिरी शहरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेनजिक जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे जिल्हा कार्यालय आहे. या कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त चा. द. तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सुशिक्षित बेरोजगारांसाठी रोजगार मेळाव्यांचे आयोजन केले जाते.

रत्नागिरीत उद्योग कमी असल्याने, मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांची मागणी होत नाही. त्यामुळे बाहेरच्या कंपन्यांना आवश्यक असलेल्या पदांनुसार मेळावे आयोजित केले जातात. यावर्षी खासगी कंपन्यांमधील भरतीसाठी पाच मेळावे घेण्यात आले. या मेळाव्याला उपस्थित ५७७पैकी १११ जणांची प्राथमिक स्तरावर निवड झाली आहे.

रोजगाराचा लाभ घ्या


कौशल्य विकास कार्यक्रमात बेरोजगारांना त्यांच्या आवड आणि गरजेनुसार प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार संधी उपलब्ध होण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. शासकीय नोकरीच्या संधी आता फारशा उपलब्ध नाहीत, तसेच खासगी क्षेत्रातही मर्यादीत संधी आहेत. त्यामुळे बेरोजगारांनी त्यावर विसंबून न राहता शासनाच्या या विविध कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांचा लाभ घेऊन रोजगार संधीचाही लाभ घ्यावा.
- गणेश बिटोडे, अधिकारी, कौशल्य
विकास, रोजगार व मार्गदर्शन केंद्र


कौशल्य विकास कार्यक्रमातून मला विनामूल्य प्रशिक्षण मिळाले. या प्रशिक्षणाचा लाभ घेत मी माझे स्वत:चे घरबसल्या ब्युटी पार्लर सुरू केले आहे. त्यामुळे मी माझे महिन्याचे उत्पन्न मिळवत असून, स्वत:च्या पायावर उभी राहिले आहे.
- मीरा चव्हाण, ब्युटीशियन


शासनाच्या कौशल्य विकास कार्यक्रमाचा फायदा बेरोजगारांना मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे त्यांच्यात नवीन कौशल्ये निर्माण होऊन किंवा जी आहेत ती अधिक विकसित होऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत.
- कोमल सोळंखी, मंडणगड


कौशल्य विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून मी ह्यबँकिंग ॲण्ड अकौटिंगह्ण या विषयाचे प्रशिक्षण घेतले. यातून रोजगाराची संधी मिळणार आहे. अन्य सुशिक्षित युवक - युवतींनीही नोकरीची अपेक्षा न करता, या विविध प्रकारच्या प्रशिक्षणांचा लाभ घेऊन स्वत:चा उद्योग-व्यवसाय सुरू करून स्वावलंबी व्हावे.
- स्वप्नाली साळवी, चिपळूण

Web Title: During Corona period 4041 unemployed were registered in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.