युद्धजन्य परिस्थितीमुळे रत्नागिरीतील हॉटेलच्या टेरेसवर पेटल्या चुली
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 16:26 IST2026-03-13T16:26:15+5:302026-03-13T16:26:41+5:30
चुली पेटवून हा व्यवसाय सुरू ठेवण्याचा पर्याय निवडला

युद्धजन्य परिस्थितीमुळे रत्नागिरीतील हॉटेलच्या टेरेसवर पेटल्या चुली
रत्नागिरी : जागतिक युद्धजन्य परिस्थितीची झळ आता हाॅटेल व्यवसायाला बसू लागली आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरवर मर्यादा आणल्याने हाॅटेल व्यावसायिक अडचणीत आले आहेत. मात्र, या संकटावर मात करण्यासाठी रत्नागिरीतील एका हाॅटेल व्यावसायिकाने चक्क हाॅटेलच्या टेरेसवर ‘चुली’ मांडून व्यवसाय सुरू ठेवण्याचा पर्याय शाेधला आहे.
युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधन पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. याचाच परिणाम म्हणून व्यावसायिक गॅस सिलिंडरचा साठा संपत चालला आहे. अशा परिस्थितीत हॉटेल बंद ठेवण्याशिवाय दुसरा पर्याय निवडणे गरजेचे हाेते. त्यामुळे रत्नागिरीतील हाॅटेल व्यावसायिक सुहास ठाकूरदेसाई यांनी हाॅटेलच्या टेरेसवर चुली पेटवून हा व्यवसाय सुरू ठेवण्याचा पर्याय निवडला आहे.
कोकणात येणाऱ्या पर्यटकांची गैरसोय होऊ नये आणि व्यवसाय सुरू राहावा, या उद्देशाने चुली पेटविण्याचा पर्याय निवडण्यात आला आहे. आता या चुलींवरच अन्नपदार्थ शिजविले जाणार आहेत. गॅसची कमतरता असल्याने आणि चुलीवर स्वयंपाक करण्यास लागणारा वेळ लक्षात घेता, हॉटेलमध्ये सध्या जेवणाचे मोजकेच ४ प्रमुख मेन्यू ठेवण्यात आले आहेत, असे ठाकूरदेसाई यांनी सांगितले.
पारंपरिकतेचा ‘जुना’ आधार
आधुनिक युगात गॅस आणि ओव्हनवर चालणारी हॉटेल्स आता पुन्हा एकदा पारंपरिकतेकडे वळत आहेत. एकीकडे लाकडाची ताेड राेखण्यासाठी शासनाकडून ‘उज्ज्वला गॅस’ याेजना सुरू करण्यात आली. मात्र, गॅस सिलिंडरच्या मर्यादेमुळे आता पुन्हा ‘जुन्याच’ पद्धतीचा आधार घेण्याची वेळ आली आहे.
लाकडे आणण्याचा वेगळा अनुभव
चुलीसाठी लागणारी लाकडे जाण्यासाठी कामगारांची लगबग सुरू झाली आहे. लाकडाची माेळी बांधून ती आणण्याचा आनंद कामगार घेत आहेत.
चुलीची पूजा अन् रांगाेळी
चूल मांडल्यानंतर त्याभाेवती रांगाेळी काढून चुलीची पूजा करण्यात आली. त्यानंतर जेवणाला सुरुवात करण्यात आली.
जर आम्ही हातावर हात धरून बसलो असतो, तर हॉटेल्स बंद करण्याची वेळ आली असती. रत्नागिरीत येणाऱ्या पर्यटकांना जेवणासाठी भटकंती करावी लागली असती म्हणूनच या युद्धजन्य परिस्थितीतही आम्ही हा पर्याय निवडला आहे. चुलीवरच्या जेवणाची चव वेगळीच असते, त्यामुळे पर्यटकांना हे जेवण अधिक आवडेल, अशी आम्हाला आशा आहे. - सुहास ठाकूरदेसाई, हाॅटेल व्यावसायिक