Ratnagiri: मोबदल्याआधी काम, ठेकेदाराला दाम; शेतकऱ्यांना पैशांची प्रतीक्षा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 17:25 IST2025-03-11T17:24:11+5:302025-03-11T17:25:00+5:30
ग्रामस्थांनी १ मेपासून आमरण उपोषणाचा इशारा दिला

Ratnagiri: मोबदल्याआधी काम, ठेकेदाराला दाम; शेतकऱ्यांना पैशांची प्रतीक्षा
चिपळूण : भूसंपादनाआधीच तालुक्यातील कापरे-भेलवणे येथील साठवण तलावाची खोदाई झाली. ठेकेदाराला २२ कोटींचे बिलही अदा झाले. मात्र, या तलावासाठी जागा देणाऱ्या ७९७ शेतकऱ्यांना आजतागायत एकही रुपया मिळालेला नाही. वारंवार पाठपुरावा करूनही भरपाई मिळत नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. ज्यांचे संमतीपत्रानुसार भूसंपादन झाले आहे, त्यांना मोबदला न मिळाल्यास ग्रामस्थांनी १ मेपासून आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.
प्रकल्पग्रस्तांतर्फे अवधुत मोरे, आरती भुर्के यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. ऑक्टोबर २०१९ पासून सुरू झालेल्या या प्रकल्पाचे भूसंपादन सहा वर्षांपासून रखडलेले आहे. न्याय मागितल्यावर खासगी वाटाघाटीने थेट खरेदी प्रस्ताव करून भूसंपादन करावे, असे आदेश देत जानेवारी २०२४ मध्ये चिपळूण प्रांताधिकाऱ्यांना प्रस्ताव दिला. मात्र, सदर भूसंपादनात व्यत्यय आणला जात आहे. शंभर टक्के संमतीपत्र झाल्याशिवाय पुढील काम करता येत नसल्याचे प्रांताधिकारी सांगत आहेत.
आजपर्यंत ७९७ पैकी ६२३ भूधारकांची संमतीपत्रे पूर्ण झाली आहेत. संमतीपत्र पूर्ण झालेल्यांना १ मे २०२५ पूर्वी मोबदला मिळावा, मृद व जलसंधारण उपविभागीय अधिकारी यांनी ऑक्टोबर २०१९ ते एप्रिल २०२३ या कालावधीत भूसंपादन अपूर्ण ठेवल्याबद्दल त्यांची विभागीय चौकशी करावी, ऑक्टोबर २०१९ मध्ये संमती नसताना जमीन बेकायदेशीरपणे ताब्यात घेऊन ठेकेदाराला २२ काेटी १ लाख रुपये बिल देणाऱ्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करून फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशा मागण्या जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आल्या आहेत.
सगळीच कामे धेडगुजरी
- जागा ताब्यात नसताना साठवण तलावाचे काम सुरू झाले. भूसंपादन रखडले असताना पुन्हा खासगी वाटाघाटीने थेट खरेदी प्रस्ताव ठेवण्यात आला. प्रारंभी शेतकऱ्यांनी होकार दिला. ६२३ भूधारकांची संमतीपत्रे पूर्ण झाली आहेत. उर्वरितांमध्ये काही मयत तर काही परदेशात आहेत.
- अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सर्वांची संमतीपत्रे आवश्यक आहेत. त्यामुळे मृतांचा वारस तपास आणि त्यासाठीचा वेळ, खरेदीपत्राचा खर्च या सर्वामुळे प्रकल्पाचे भवितव्य अंध:कारमय झाले आहे.