मंडणगड तालुक्यात पाण्यासारखा पैसा खर्च, तरी पाण्याची समस्या कायम
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 16:06 IST2025-04-17T16:05:49+5:302025-04-17T16:06:05+5:30
प्रशांत सुर्वे मंडणगड : जलजीवन मिशनसारख्या अनेक योजनांच्या माध्यमातून तालुक्यात पाण्यासारखा पैसा खर्च झाला. पाणीटंचाईची समस्या मात्र वर्षानुवर्षे तशीच ...

मंडणगड तालुक्यात पाण्यासारखा पैसा खर्च, तरी पाण्याची समस्या कायम
प्रशांत सुर्वे
मंडणगड : जलजीवन मिशनसारख्या अनेक योजनांच्या माध्यमातून तालुक्यात पाण्यासारखा पैसा खर्च झाला. पाणीटंचाईची समस्या मात्र वर्षानुवर्षे तशीच आहे. तालुक्यातील कागदावर असलेली लोकसंख्या व वास्तवात असलेली लोकसंख्या यात तफावत आहे. ५० टक्क्यांहून अधिक लोक तालुक्याबाहेर आहेत. त्यामुळे टंचाईचे सावट तुलनेने कमी जाणवत आहे. कागदावर आहेत, तेवढे लोक प्रत्यक्षात त्या - त्या गावांमध्ये असते तर टंचाईचे हे चित्र अधिक भीषण झाले असते.
मंडणगड पंचायत समिती पाणी पुरवठा विभागाच्या माध्यमातून तालुक्यातील पाणीटंचाईच्या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी यंदा काहीशा विलंबाने पाणी टंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला. यात तालुक्यातील ३१ गावातील ३७ वाड्यांना पाणीटंचाईची समस्या भेडसावेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याकरिता १ कोटी २३ लाख इतका निधी खर्च होणे अपेक्षित आहे. मार्च महिन्याचा विलंब लक्षात घेता दोन टप्प्यात याकरिता काम केले जाणार आहे.
टंचाई कृती आराखड्यात नवीन विंधन विहीर खणणे, जुन्या नळपाणी योजनांची दुरुस्ती करणे, तात्पुरत्या नळपाणी पुरवठा योजना सुरू करणे व आवश्यकता भासल्यास टँकरचा पाणी पुरवठा करण्यासाठीही निधीचे नियोजन करण्यात आले आहे. तीव्र टंचाईच्या काळात तालुक्यातील पाच गावातील सात वाड्यांवर दरवर्षी टँकरने पाणी पुरवठा करावा लागतो. विविध नळपाणी योजनांची सातत्याने अंमलबजावणी करूनही पाण्याची गैरसोय दूर झालेली नसल्याची तक्रार तालुक्यातून नेहमीच केली जाते.
राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत तालुक्यातील ८०हून अधिक गावात प्रभावी अंमलबजावणी यंत्रणा करीत आहेत. या योजनेची अंमलबजावणी चुकीच्या पद्धतीने झाल्याची अनेकांची तक्रार आहे. त्याचेच प्रतिबिंब टंचाई आखड्यात दिसत आहे. या पुढील काळात या यादीत आणखी भर पडण्याची शक्यता आहे. टंचाई आराखड्यात १३ गावातील १४ वाड्यांमध्ये नवीन विंधन विहीर, एका गावातील एका वाडीवर विंधन विहीर दुरुस्ती, १० गावातील १३ वाड्यांवर नळयोजना दुरुस्ती, ५ गावातील ६ वाड्यांवर तात्पुरत्या पूरक नळपाणी योजनेचे काम प्रस्तावित आहे. याखेरीज २ गावातील ३ वाड्यांना टँकरने पाणी पुरवठा करावा लागणे यंत्रणेनेच अपेक्षित धरले आहे.
तालुक्यातील तिडे, भोळवली, तुळशी, चिंचाळी या धरणातील पाण्याचा थेट वापर केला जात नाही. मात्र, या धरणामुळे या परिसरातील पाण्याची पातळी वाढली आहे. तिडे धरणवगळता भोळवली व तुळशी धरणातील पाण्याचा शेतीसाठीही उपयोग होत नाही. जुन्या धरणांचे कालवे बुजून गेले आहेत. त्यामुळे गावालगत धरण असूनही गावात पाणी नाही, अशी स्थितीही दिसते.