दादांनी दिलेला शब्द त्यांच्या अर्धांगिनीने पाळला, आमदार शेखर निकम यांच्या कन्येच्या विवाह सोहळ्याला लावली उपस्थिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 15:58 IST2026-02-21T15:53:44+5:302026-02-21T15:58:06+5:30
आमदार शेखर निकम यांच्या कन्येच्या विवाह सोहळ्याला येण्याचे आश्वासन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते

दादांनी दिलेला शब्द त्यांच्या अर्धांगिनीने पाळला, आमदार शेखर निकम यांच्या कन्येच्या विवाह सोहळ्याला लावली उपस्थिती
चिपळूण : आमदार शेखर निकम यांची कन्या मुक्ता हिचा विवाह अक्षय शिंदे याच्याशी सावर्डे येथे शुक्रवारी पार पडला. या विवाह सोहळ्याला येण्याचे आश्वासन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते. नियतीने दादांना हिरावून नेले. मात्र, त्या शब्दाची शान राखत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दुःख पचवत स्वतः उपस्थित राहून नवदाम्पत्याला आशीर्वाद दिले.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
या विवाह सोहळ्याला उद्योगमंत्री व पालकमंत्री उदय सामंत, अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ, आनंदराव अडसूळ, आमदार भास्कर जाधव, प्रकाश सुर्वे, योगेश सागर, माजी आमदार राजन साळवी, अनिकेत तटकरे, वैभव नाईक, सदानंद चव्हाण, नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते, तसेच मराठी अभिनेते संजय खापरे, प्रभाकर मोरे, क्रिकेट प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांनीही उपस्थिती लावली हाेती.
अक्षता पडल्यावर काही वेळात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार विवाहस्थळी दाखल झाल्या. त्या स्टेजवर येताच आमदार निकम यांच्या पत्नी पूजा निकम यांनी त्यांना मिठी मारली; त्याक्षणी दोन्ही कुटुंबांतील स्नेहबंधांचा भावनिक आविष्कार सर्वांच्या डोळ्यांत पाणी आणणारा ठरला. उपमुख्यमंत्री पवार यांनी नवदाम्पत्याला शुभेच्छा देत आशीर्वाद दिले. मात्र, त्यांनी इतरांकडून औपचारिक शुभेच्छा स्वीकारणे टाळले.
याप्रसंगी ज्येष्ठ चित्रकार प्रकाश राजेशिर्के यांनी त्यांना चित्र भेट दिले. यावेळी अनिरुद्ध निकम, प्रशांत निकम, सई निकम-सुर्वे, डॉ. तानाजी चोरगे यांच्यासह निकम कुटुंब उपस्थित होते. दादांचा शब्द, सुनेत्रा पवारांची उपस्थिती आणि दोन कुटुंबांतील जिव्हाळा या सर्वांनी सावर्डेतील विवाह सोहळा भावनांनी ओथंबलेला एक संस्मरणीय क्षण ठरला.
स्मृतींना अभिवादन
विवाह सोहळ्यानिमित्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार प्रथमच याठिकाणी आल्या हाेत्या. त्यांच्या चेहऱ्यावर दुःखाची छटा स्पष्ट दिसत होती, तरीही त्यांनी आवर्जून स्व. गोविंदराव निकम यांच्या स्मृतिस्थळाला भेट देऊन समाधीचे दर्शन घेतले आणि कुटुंबीयांशी संवाद साधला.