Ratnagiri: गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर आढळला मृत डॉल्फिन
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 14:37 IST2025-06-05T14:36:10+5:302025-06-05T14:37:10+5:30
गणपतीपुळे : येथील समुद्रकिनाऱ्यावर बुधवार, ४ जून रोजी एक डॉल्फिन मृतावस्थेत सापडला आहे. कोकण किनारी डॉल्फिनचे प्रमाण तुलनेने कमी ...

Ratnagiri: गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर आढळला मृत डॉल्फिन
गणपतीपुळे : येथील समुद्रकिनाऱ्यावर बुधवार, ४ जून रोजी एक डॉल्फिन मृतावस्थेत सापडला आहे. कोकण किनारी डॉल्फिनचे प्रमाण तुलनेने कमी आहे. त्यामुळे हा डॉल्फिन गणपतीपुळे किनाऱ्यावर कसा आला, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
बुधवारी दुपारी किनाऱ्यावरील शांत वातावरणात हा डॉल्फिन मृत अवस्थेत पडलेला स्थानिकांना तसेच पर्यटकांना दिसले. त्यामुळे अनेकांनी तेथे धाव घेतली. हा डॉल्फिन साधारण ४ फूट लांबीचा आहे. मात्र तो कोणत्या प्रजातीचा आहे किंवा त्याच्या मृत्यूचे नेमके कारण काय, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
या घटनेची माहिती तातडीने स्थानिक प्रशासनाला आणि वन विभागाला कळवण्यात आली. मृत डॉल्फिनला किनाऱ्यावरून सुरक्षितपणे हटवून त्याच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
समुद्रातील प्रदूषण, जहाजाची धडक किंवा नैसर्गिक बदलांमुळे सागरी जीवांना धोका निर्माण होत असल्याचे अनेकदा दिसून येते. या डॉल्फिनच्या मृत्यूमागे नेमके काय कारण आहे, हे शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होऊ शकणार आहे.