पाचल : राजापूर तालुक्यातील पाचल-जवळेथर रस्त्यावरील अनेक मोऱ्या खचल्या असून, या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दुतर्फा झाडी वाढलेली आहेत. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीला धोकादायक बनल्याने, या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी परिसरातून करण्यात येत आहे.
पाचल-जवळेथर हा १६ किलाेमीटरचा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात आहे. सिंधुदुर्ग व कोल्हापूर या दोन जिल्ह्यांना जोडणारा हा महत्त्वाचा रस्ता आहे. त्यामुळे या रस्त्यावर नेहमीच वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू असते. सद्यःस्थितीत या रस्त्यावर दुतर्फा वाढलेली झाडी, खचलेल्या मोऱ्या व पडलेले खड्डे, यामुळे हा रस्ता वाहतुकीला धोकादायक बनला आहे. याकडे या भागातील स्थानिक लोकप्रतिनिधी व सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे दुर्लक्ष होत आहे. या खड्डेमय रस्त्यातून वाहन चालविताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे, तसेच दुतर्फा झाडी वाढल्याने या रस्त्यावर सातत्याने लहान-मोठे अपघात होत आहेत. या रस्त्यावर वर्षापूर्वी बांधलेल्या मोऱ्या उखडल्या असून, यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. वाढलेली झाडी, खचलेल्या मोऱ्या, खड्डे व साइडपट्टी नसल्याने, हा रस्ता वाहन चालकांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे. बांधकाम विभागाने या रस्त्याची वेळीच दुरुस्ती न केल्यास मोठी दुर्घटना होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात येत आहे.