तिवरे धरणफुटी : आजारी असतानाही ते कर्तव्यात मग्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 14:47 IST2019-07-09T14:46:02+5:302019-07-09T14:47:11+5:30
तिवरे (ता. चिपळूण) भेंदेवाडीत फुटलेल्या धरणात बुडालेल्यांचा शोध घेण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) अथक काम करीत आहे. मुसळधार पाऊस आणि पुराचे पाणी यात अगदी गळ्यापर्यंतच्या पाण्यात, तर कधी झाडाझुडुपात ही शोधमोहीम सुरू आहे. यामुळे अनेकजण आजारी पडत आहेत. मात्र, तरीही तात्पुरत्या औषधोपचारानंतर पुन्हा आपल्या शोधकार्यात मग्न होत आहेत.

तिवरे धरणफुटी : आजारी असतानाही ते कर्तव्यात मग्न
रत्नागिरी : तिवरे (ता. चिपळूण) भेंदेवाडीत फुटलेल्या धरणात बुडालेल्यांचा शोध घेण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) अथक काम करीत आहे. मुसळधार पाऊस आणि पुराचे पाणी यात अगदी गळ्यापर्यंतच्या पाण्यात, तर कधी झाडाझुडुपात ही शोधमोहीम सुरू आहे. यामुळे अनेकजण आजारी पडत आहेत. मात्र, तरीही तात्पुरत्या औषधोपचारानंतर पुन्हा आपल्या शोधकार्यात मग्न होत आहेत.
मंगळवारी रात्री या दुर्घटनेची माहिती कळताच सिंधुदुर्ग आणि पुणे येथील एनडीआरएफच्या बटालियन ५च्या दोन तुकड्या दलप्रमुख सच्चिदानंद गावडे यांच्या नेतृत्त्वाखाली बुधवारी तातडीने तिवरेत दाखल झाल्या. गेले सहा दिवस या जवानांची शोधमोहीम सुरू आहे. २३ पैकी २० मृतदेह सापडले आहेत. अजूनही तीन जणांचा शोध सुरू आहे.
या जवानांची शोधमोहीम सकाळी सात वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत सुरू असते. वादळी पावसाचा जोर आहे. त्यातच या भागात पाणी सातत्याने वाढत आहे. चिखलमय परिस्थिती आहे, अशा प्रतिकूल परिस्थितीतही या जवानांची मृतदेह शोधण्याची धडपड सुरू आहे.
गळाभर पाण्यातून, चिखलमय भागातून, झाडीझुडुपातून काम करत असल्याने या वातावरणाचा त्रास काहींना जाणवू लागला आहे. मात्र, ह्यआपदा सेवेत सदैवह्ण हे ब्रीद घेऊन काम करणारे हे जवान आजारपण तात्पुरत्या औषधोपचाराने मागे टाकत पुन्हा आपल्या मोहिमेवर जाऊन शोध मोहीम सुरू ठेवत आहेत.
आरोग्याची तपासणी
या दलाचे सेकंड इन कमांड सच्चिदानंद गावडे सध्या दिल्ली येथे असल्याने या दलाचे नेतृत्व राजेश यावले यांच्याकडे आहे. मात्र, तेही या कामात मागे न राहता स्वत: मोहीमेत अग्रेसर आहेत. ही मोहीम किती दिवस पार पाडावी लागणार, हे अजून तरी अनिश्चित आहे. तरीही ही अवघड मोहीम पार पाडताना या जवानांच्या आरोग्याचा विचारही करणे गरजेचे असल्याने आरोग्य विभागाने त्यांच्याही आरोग्यविषयक तपासणीला प्रारंभ केला आहे.