Ratnagiri: बसने रस्ता सोडला, झाडाने जीव वाचवला; दाभोळ-मुंबई बसला शेनाळे घाटात अपघात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 13:44 IST2025-01-14T13:44:00+5:302025-01-14T13:44:19+5:30

मंडणगड : दापाेलीहून मुंबईच्या दिशेने निघालेली दाभाेळ - मुंबई एसटी बस रस्ता साेडून १५ फूट खाली घसरून पलटी झाल्याची ...

Dabhel Mumbai bus accident at Shenale ghat, The bus got stuck in a tree and got stuck in the dam | Ratnagiri: बसने रस्ता सोडला, झाडाने जीव वाचवला; दाभोळ-मुंबई बसला शेनाळे घाटात अपघात 

Ratnagiri: बसने रस्ता सोडला, झाडाने जीव वाचवला; दाभोळ-मुंबई बसला शेनाळे घाटात अपघात 

मंडणगड : दापाेलीहून मुंबईच्या दिशेने निघालेली दाभाेळ - मुंबई एसटी बस रस्ता साेडून १५ फूट खाली घसरून पलटी झाल्याची घटना रविवारी मध्यरात्री मंडणगड ते म्हाप्रळ मार्गावरील शेनाळे घाटात घडली. सुदैवाने ही बस झाडाला अडकल्याने रस्त्याशेजारील चिंचाळी धरणात काेसळता काेसळता वाचली. त्यामुळे बसमधील ४१ प्रवाशांचे प्राण वाचले.

बसचालक व्ही. एस. गावडे हे दाभाेळ - मुंबई बस (एमएच १४, बीटी २२६५) घेऊन निघाले हाेते. या बसमध्ये वाहक मंदार भाेईर यांच्यासह ४१ प्रवासी हाेते. ही बस मंडणगड येथून निघाली असता, मध्यरात्री १:५५ च्या दरम्यान चिंचाळी धरणानजीक आली असता बसने रस्ता साेडला आणि १५ फूट बाजूला उलटली. सुदैवाने त्याचठिकाणी असणाऱ्या झाडाला बस अडकल्याने माेठा अनर्थ टळला. या अपघातात प्रवाशांना किरकाेळ दुखापत झाली आहे.

या अपघातादरम्यान चाैक (ता. खालापूर, जि. रायगड) येथील मनोज थोरवे व त्यांचे सहकारी प्रवास करत हाेते. त्यांनी अपघात पाहिला आणि ते मदतीसाठी थांबलेे. तसेच मंडणगड येथील सचिन चव्हाण व गोठे गावातील जितेंद्र दवंडे हे एका रुग्णाला घेऊन या मार्गाने मुंबईला जात होते. चव्हाण यांनी थांबून गाडीत चढून प्रवाशांना बाहेर काढले. गाडीतील काही तरुण प्रवाशांनीही त्यांना मदत केली. त्याचबरोबर नगरसेवक मुश्ताक दाभीळकर यांनीही मदत करून जखमींना बाहेर काढले.

या अपघाताची माहिती मिळताच मंडणगडचे पोलिस निरीक्षक नितीन गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संजय धुपकर, पोलिस हवालदार गणेश चव्हाण, पोलिस काॅन्स्टेबल सुहास मांडवकर, विशाल कोळथरकर, महेंद्र तांदळे, आकाराम माने यांनी मदतकार्यात सहभाग घेतला. जखमी प्रवाशांना रुग्णवाहिकेने मंडणगड ग्रामीण रुग्णालयात आणून प्राथमिक उपचार करून घरी सोडण्यात आले.

संरक्षक भिंत गरजेची

सुमारे चार वर्षांपूर्वी याच ठिकाणावरून एक डंपर धरण क्षेत्रात कोसळून एका तरुणाचा जीव गेला होता. त्यामुळे याठिकाणी संरक्षक भिंत उभारण्याची मागणी होत आहे.

यंत्रणांचे दूरध्वनी बंद

या अपघाताची माहिती देण्याकरिता नागरिकांनी मंडणगड तहसील कार्यालय, पोलिस स्थानक व दवाखान्यात संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, या तिन्ही ठिकाणचे फोन बंद हाेते. त्यामुळे आपत्तीच्या काळात नेमका संपर्क काेठे साधायचा, असा प्रश्न केला जात आहे.

Web Title: Dabhel Mumbai bus accident at Shenale ghat, The bus got stuck in a tree and got stuck in the dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.