राजापुरात गाेवा बनावटीची दारू जप्त, सिंधुदुर्गातील एक जणांवर कारवाई
By अरुण आडिवरेकर | Updated: March 21, 2023 14:11 IST2023-03-21T14:11:07+5:302023-03-21T14:11:59+5:30
कारवाईत एकूण २ लाख ०१ हजार ४८८ रुपयांचा ऐवज जप्त

राजापुरात गाेवा बनावटीची दारू जप्त, सिंधुदुर्गातील एक जणांवर कारवाई
राजापूर : बिगर परवाना गाेवा बनावटीच्या दारूची वाहतूक करणाऱ्या सिंधुदुर्गातील एका वृद्धावर राजापूर तालुक्यातील ताम्हाणे येथे कारवाई करण्यात आली. या कारवाईत एकूण २ लाख ०१ हजार ४८८ रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई काल, सोमवारी (दि.२०) करण्यात आली असून, प्रदीप विश्वनाथ निग्रे (५७, रा. खारेपाटण, काेष्टेआळी, कणकवली) याला नाेटीस देण्यात आली आहे.
याप्रकरणी रायपाटण पाेलिस दूरक्षेत्राचे पाेलिस काॅन्स्टेबल भीम काेळी यांनी फिर्याद दिली आहे. प्रदीप निग्रे हा मारुती ओमनी (एमएच ०७, एजी ३०२) या गाडीतून गाेवा बनावटीच्या दारूची वाहतूक करत हाेता. राजापूर तालुक्यातील ताम्हाणे गावातील ताम्हणकरवाडी येथील बसथांब्याजवळील रस्त्यावर पाेलिसांनी त्याची गाडी तपासणीसाठी थांबवली. गाडीची तपासणी केली असता त्यात गाेवा बनावटीची बिगर परवाना दारू असल्याचे दिसले. पाेलिसांनी ५६४ सीलबंद बाॅटल जप्त केल्या असून, त्यांची किंमत २६,४८८ रुपये इतकी आहे. या दारूसाठ्यासह १ लाख ७५ हजार रुपये किंमतीची गाडीही पाेलिसांनी जप्त केली आहे.
याप्रकरणी पाेलिस स्थानकात महाराष्ट्र दारू अधिनियम कलम ६५ (ए)(ई) नुसार गुन्हा नाेंद करण्यात आला आहे. तसेच प्रदीप निग्रे याला सी. आर. पी. सी. ४१ (१)(अ) प्रमाणे नाेटीस बजावण्यात आली आहे. अधिक तपास पाेलिस करत आहेत.