CoronaVirus : मेडिकल कॉलेजसाठी प्रस्ताव तयार करा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2020 03:19 PM2020-06-09T15:19:24+5:302020-06-09T15:36:58+5:30

रत्नागिरीतील जिल्हा शासकीय रूग्णालयाचा ऑनलाईन लोकार्पण सोहळा ठाकरे यांच्या हस्ते झाला. यावेळी आरोग्य यंत्रणा सुसज्ज पाहिजे. यासाठी डॉक्टर ही महत्वाची गरज आहे. त्यादृष्टीने जिल्ह्यात मेडिकल कॉलेज सुरू करण्यासाठी प्रस्ताव तयार करा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रशासनाला दिले.

CoronaVirus: Prepare proposal for medical college: Chief Minister Uddhav Thackeray | CoronaVirus : मेडिकल कॉलेजसाठी प्रस्ताव तयार करा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

CoronaVirus : मेडिकल कॉलेजसाठी प्रस्ताव तयार करा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Next
ठळक मुद्देमेडिकल कॉलेजसाठी प्रस्ताव तयार करा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेरत्नागिरीत लॅबचे उद्घाटन, ट्रामा केअर सेंटरची उभारणी आवश्यक

रत्नागिरी : आरोग्य यंत्रणा सुसज्ज पाहिजे. यासाठी डॉक्टर ही महत्वाची गरज आहे. त्यादृष्टीने जिल्ह्यात मेडिकल कॉलेज सुरू करण्यासाठी प्रस्ताव तयार करा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रशासनाला दिले. रत्नागिरीतील जिल्हा शासकीय रूग्णालयाचा ऑनलाईन लोकार्पण सोहळा ठाकरे यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. त्यांच्यासमवेत पालकमंत्री अ‍ॅड. अनिल परब हेही होते.

या ऑनलाईन लोकार्पण सोहळ्यात मुंबईहून प्रधान सचिव प्रदीप व्यास, आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे तर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, सर्व आमदार, विधानपरिषदेचे आमदार प्रसाद लाड, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बघाटे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता जयंत कुलकर्णी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी हे काम आपले एकट्याचे नसल्याचे सांगून सर्व यंत्रणांना धन्यवाद दिले. लॉकडाऊन केले आणि कुलूपाची चावी हरवली असे होता नये. संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ नये. जनजीवन सुरळीत होईल त्यावेळी आरोग्य सुविधा वाढविलेल्या हव्यात, असे ते म्हणाले. विकास करत असताना आपण स्वत:ला विसरलो होतो. कोरोनाने लॉकडाऊनच्या निमित्ताने आपल्याकडे, कुटुंबाकडे पाहायला शिकविले. चांगल्या सवयी, वाईट सवयी दाखविल्या कोरोनाने कुटुंब, घर दाखविले, काळजी कशी घ्यावी हेही दाखविले, असे ते म्हणाले.

यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रत्नागिरीत कोरोना विषाणू लॅब झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. या लॅबमध्ये अ‍ॅटोमेशन केल्यास अधिक चाचण्या करता येतील, असे त्यांनी सुचविले तसेच जिल्ह्यात अपघातांची वाढती संख्या पाहता ट्रामा केअर सेंटर उभारणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी आरोग्य विभागातील रिक्त पदे भरण्याचे आश्वासन दिले. चाकरमानी आले आहेत, त्यांची चाचणी करा. तसेच रत्नागिरीत आयएमए या संघटनेचा उपयोग करून कोरोना मृतांची संख्या कमी करा, असे सांगितले.

प्रस्तावनेत जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी १५ दिवसांत लॅब उभारणीसाठी सहकार्य करून १ कोटी ७ लाखाचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री यांना धन्यवाद दिले. आरोग्य विभागाचे मुख्य सचिव प्रदीप व्यास, रत्नागिरीचे पालकमंत्री अ‍ॅड. अनिल परब, राज्यमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत यांनीही या कोरोना चाचणी लॅबसाठी शासनाने दाखविलेल्या तत्परतेबद्दल शासनाला धन्यवाद दिले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बघाटे यांनी आभार मानले.

वाढती संख्या कमी करण्याकडे लक्ष द्या

लॅब आली म्हणजे आपण सुरक्षित झालो, असे समजू नका. आता लॅबमुळे वाढलेली संख्या दिसणार आहे. त्यामुळे वाढती संख्या कमी कशी करता येईल, याकडे लक्ष द्यायला हवे. ही संख्या शून्यावर येईल, ते आपले यश असेल, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. कोरोनाचे आव्हान पत्करणारे आरोग्य यंत्रणेचे लोक ही खरी संपत्ती आहे. त्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्या, असेही मुख्यमंत्री यांनी सांगितले.

 

Web Title: CoronaVirus: Prepare proposal for medical college: Chief Minister Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.