निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये धुसफूस; चिपळूणमध्ये नगराध्यक्षपदासाठी ३, नगरसेवक होण्यासाठी ३३ इच्छुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 15:32 IST2025-10-29T15:29:20+5:302025-10-29T15:32:24+5:30
पदाधिकाऱ्यांमध्ये झाली खडाजंगी

निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये धुसफूस; चिपळूणमध्ये नगराध्यक्षपदासाठी ३, नगरसेवक होण्यासाठी ३३ इच्छुक
चिपळूण : आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या आढावा बैठकीत नगराध्यक्षपदासाठी अचानक ३ इच्छुक उमेदवार पुढे आले. नगरसेवकपदासाठीही ३३ जणांनी अर्ज सादर केले. मात्र, नगराध्यक्षपदावरून या बैठकीत दोन मतप्रवाह निर्माण झाले. त्यातूनच पदाधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी झाली. ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर्गत धुसफूस निर्माण झाल्याने जिल्हाध्यक्ष सोनललक्ष्मी घाग यांच्यापुढे पेच निर्माण झाला आहे.
शहरातील धवल प्लाझाच्या सभागृहात झालेल्या जिल्हा आढावा बैठकीला महाराष्ट्र काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष रामचंद्र दळवी, सरचिटणीस शशांक बावचकर, श्रद्धा ठाकूर, जिल्हाध्यक्ष सोनललक्ष्मी घाग, सर्व तालुकाध्यक्ष, युवक जिल्हाध्यक्ष, विद्यार्थी काँग्रेस जिल्हाध्यक्ष, महिला तालुकाध्यक्षा, विविध सेलचे पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीच्या सुरुवातीलाच नगराध्यक्षपदाची चर्चा सुरू असतानाच तालुकाध्यक्ष लियाकत शाह यांच्या नावाची चर्चा सुरू होती. अशातच काही पदाधिकाऱ्यांनी ॲड. जीवन रेळेकर यांच्या नावाची मागणी केली. त्यावरून काही पदाधिकाऱ्यांमध्ये चढाओढ झाली. त्यातून पक्षासाठी कोण किती योगदान देतो इथपर्यंत ही चर्चा ताणली गेली. त्यानंतर पक्षस्तरावर याबाबत निर्णय घेऊन नगराध्यक्ष पदासाठीचा उमेदवार अधिकृत घोषित केला जाईल, असे निरीक्षकांकडून स्पष्ट करण्यात आले.
त्यानंतर नगरसेवकपदाच्या २८ जागांसाठी ३३ उमेदवारांनी अर्ज सादर केले. मात्र काही प्रभागांमध्ये दोन ते तीन उमेदवार पुढे आल्याने त्यावरूनही काहीशी धुसफूस झाली. याबाबत सायंकाळी उशिरापर्यंत चर्चा सुरू होती.
सन्मानाने पद दिले नाही तर स्बळावर
लोकसभा, विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने महाविकास आघाडीचा धर्म पाळला. त्यावेळी काँग्रेसने उद्धवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला साथ दिली. मात्र, आता नगरपरिषद निवडणुकीत या दोन्ही पक्षांनी काँग्रेसला साथ देणे आवश्यक आहे. महाविकास आघाडीकडून नगराध्यक्षपद सन्मानपूर्वक न मिळाल्यास स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी या बैठकीत स्पष्टपणे मांडण्यात आली.
तिसरे नाव कोणाचे
नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीची मागणी करणारा आणखी एक अर्ज पक्षाकडे दाखल झाला आहे. मात्र, आधीच्या दोन नावांवर इतका गदारोळ झाला की त्यात तिसऱ्या अर्जाबाबत कोणालाच सुचले नाही. हे नाव बैठकीत पुढे आले नाही. त्यावर काही चर्चाच झाली नाही. २८ नगरसेवकपदांसाठी तब्बल ३३ जणांचे इच्छुक म्हणून अर्ज