राणे यांच्या अटकेसाठी गोळवली गावची निवड हेतूपुरस्सर?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2021 21:14 IST2021-08-24T21:13:59+5:302021-08-24T21:14:47+5:30
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक होणार असल्याचे वृत्त सकाळपासून वाऱ्यापेक्षाही अधिक गतीने फिरत होते.

राणे यांच्या अटकेसाठी गोळवली गावची निवड हेतूपुरस्सर?
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक होणार असल्याचे वृत्त सकाळपासून वाऱ्यापेक्षाही अधिक गतीने फिरत होते. अटक होणार का? झाली तर चिपळुणात होणार की संगमेश्वरला की रत्नागिरीला याबाबत जोरदार चर्चा सुरू होत्या. मात्र अनपेक्षितपणे पोलिसांनी महामार्गापासून एक कि.मी. आतमध्ये असलेल्या गोळवली गावाची त्यासाठी निवड केली. महामार्गावर एखाद्या ठिकाणी अटक झाली असती तर कदाचित अधिक उद्रेक झाला असता. त्याऐवजी अंतर्गत ठिकाणी ही कारवाई तुलनेने वेगाने झाली आणि कोणी आडवे आले नाही.
चिपळूण किंवा संगमेश्वर अशा ठिकाणी अटक झाली असती तर कदाचित पोलिसांना तेथेच रास्तारोकोचा सामना करावा लागला असता. भाजप कार्यकर्ते अधिक आक्रमक झाले असते. महामार्गावरील कार्यक्रमांच्या ठिकाणी भाजप कार्यकर्ते अधिक होते. त्यामुळे अशा ठिकाणी जर मंत्री राणे यांना अटक झाली असती तर पोलिसांना कार्यकर्त्यांच्या रोषाचाही सामना करावा लागला असता.
गोळवली हे ठिकाण महामार्गापासून काहीसे आतमध्ये आहे. ग्रामीण रस्ता असल्याने तेथे रास्तारोको होण्याचा प्रश्न नव्हता. त्यामुळे पोलीस त्यांना घेऊन थेट संगमेश्वर पोलीस स्थानकापर्यंत गेले. त्यामुळेच पोलिसांनी नारायण राणे यांना अटक करण्यासाठी गोळवलीची निवड करण्यात आली असल्याची चर्चा आहे.