चिपळूण नगर परिषदेच्या खताला हरित महासिटी कंपोस्ट ब्रँड; मार्केटिंग, अधिकृत विक्री करता येणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 16:03 IST2025-04-19T16:02:54+5:302025-04-19T16:03:25+5:30
चिपळूण : शहरातील शिवाजीनगर येथील नगर परिषदेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात ओला कचऱ्यापासून सेंद्रिय खतनिर्मिती केली जात आहे. या खताला ...

चिपळूण नगर परिषदेच्या खताला हरित महासिटी कंपोस्ट ब्रँड; मार्केटिंग, अधिकृत विक्री करता येणार
चिपळूण : शहरातील शिवाजीनगर येथील नगर परिषदेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात ओला कचऱ्यापासून सेंद्रिय खतनिर्मिती केली जात आहे. या खताला शासनाकडून हरित महासिटी कंपोस्ट ब्रँड मिळाला आहे. यामुळे नगर परिषदेला आता आपल्या खताचे मार्केटिंग आणि अधिकृत विक्री करता येणार आहे.
चिपळूण नगर परिषद हद्दीमध्ये दैनंदिन सुमारे ६-७ टन इतका ओला कचरा निर्माण होत आहे. हा ओला कचरा नगर परिषदेच्या घंटागाडीमार्फत वेगळा जमा केला जाताे. जमा होणाऱ्या ओल्या कचऱ्यावर चिपळूण नगर परिषदेच्या शिवाजीनगर येथील घनकचरा प्रक्रिया केंद्रावर असलेल्या ऑरगॅनिक वेस्ट कंपोस्ट मशीन व बायोगॅसद्वारे प्रक्रिया करण्यात येते. या प्रक्रियेद्वारे सेंद्रिय खत व वीजनिर्मिती केली जात आहे. तयार झालेल्या खताची तपासणी करण्यासाठी खतनियंत्रण प्रयोगशाळा कोल्हापूर येथे पाठविण्यात आले होते. त्यानुसार खत तपासणी अहवाल प्राप्त झाला होता.
हा अहवाल राज्य अभियान संचालक स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी मुंबई यांच्याकडे हरित ब्रँडसाठी पाठविण्यात आला होता. राज्य अभियान संचालक यांच्याकडून खत तपासणी अहवालाची छाननी केली गेली. हरित ब्रँडसाठी लागणारी सर्व गुणांकने एफसीओ मानकानुसार बसत आहेत. त्यामुळे चिपळूण नगर परिषदेकडे असणाऱ्या खताला शासन स्तरावरून हरित महासिटी कंपोस्ट ब्रँड मिळाला आहे.
नगर परिषदेने तयार केलेल्या खताला हरित महासिटी कंपाेस्टस ब्रँड मिळाला आहे. त्यामुळे नगर परिषदेकडून तयार करण्यात आलेल्या खताची विक्री केली जाणार आहे. ज्या नागरिकांना खत पाहिजे असेल त्यांनी नगर परिषदेच्या आरोग्य विभागाशी संपर्क साधावा. - विशाल भोसले, मुख्यााधिकारी