Chiplun Flood: त्यांचा आवाजच 'राउडी राठोड'सारखा; भास्कर जाधवांच्या वर्तणुकीवर 'ती' महिला स्पष्टपणे बोलली
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2021 15:26 IST2021-07-26T15:05:42+5:302021-07-26T15:26:18+5:30
Chiplun Flood: अद्याप आमच्याकडे लाईट नाहीये, माझ्या मोबाईललाही चार्जिंग नाही. त्यामुळे, सोशल मीडियावर काय अपप्रचार करत आहेत, हे मला माहिती नाही. त्यांनी काहीही उद्धट बोलले नाही, ते जे बोलले ते वडिलकीच्या नात्याने बोलले.

Chiplun Flood: त्यांचा आवाजच 'राउडी राठोड'सारखा; भास्कर जाधवांच्या वर्तणुकीवर 'ती' महिला स्पष्टपणे बोलली
मुंबई - राज्यातील विविध भागात गेल्या आठवडाभर झालेल्या तुफान पावसामुळे मुंबई, कोकणासह सांगली, कोल्हापूर यांसारख्या अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली होती. अनेक ठिकाणी दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनेत शेकडो जणांचा मृत्यू झाला. लाखो नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक राजकीय नेतेमंडळींनी पूरग्रस्त भागांना भेटी दिल्या. चिपळूणमध्ये मुख्यमंत्री पाहणी करायला गेले असताना घडलेल्या घटनेवरून आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. भास्कर जाधव यांचा व्हिडिओ व्हायरल होत असून त्यावरुन त्यांची भाषा उर्मट असल्याचं बोललं जातंय. यासंदर्भात आता, स्वत: चिपळूणमधील त्या महिलेनं स्पष्टीकरण दिलं आहे.
अद्याप आमच्याकडे लाईट नाहीये, माझ्या मोबाईललाही चार्जिंग नाही. त्यामुळे, सोशल मीडियावर काय अपप्रचार करत आहेत, हे मला माहिती नाही. त्यांनी काहीही उद्धट बोलले नाही, ते जे बोलले ते वडिलकीच्या नात्याने बोलले. त्यांचे आणि आमचे चांगले संबंध आहेत. त्यांचा आवाजच राऊडी राठोडसारखा असल्यामुळे ते तसं वाटलं असेल. पण, प्रत्येकवेळी ते मदत करतात, सगळ्या व्यापाऱ्यांनाही ते मदत करतात. कालही ते तशाच मदतीच्या भावनेने आले होते, ते काहीही वाईट बोलले नाहीत. त्यांचं बोलणंच तसं आहे. त्यामुळे, चुकीचा अर्थ काढण्यासारखं काहीही नाही, असे चिपळूणमधील पीडित महिला स्वाती भोजने यांनी म्हटलं आहे.
मी दबावात बोलत नाही
मी कुठल्याही दबावात हे बोलत नाही, जर दबाव असता तर मी कालच आमदार-खासदारांचा पगार काढला नसता. ते त्यांच्या धावत्या दौऱ्यात आणि आम्ही आमच्या टेंशनमध्ये त्यातून ते वडिलकीच्या नात्याने असं बोलले, असे स्पष्टीकरण स्वाती भोजने यांनी भास्कर जाधव यांच्या वक्तव्यावर दिलं आहे.
भास्कर जाधवांविरुद्ध महिलांचा आक्रोश
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या चिपळूण दौऱ्यादरम्यान एका महिलेने आमदांराचा २ महिन्याचा पगार फिरवा आणि आम्हाला नुकसान भरपाई द्या. अशी मागणी केली होती. ''आमदार 5 महिन्यांचा पगार देतील पण त्याने काहीही होणार नाही, बाकी काय, तुमचा मुलगा कुठयं, अरे आईला समजव, उद्या ये'' असे अरेरावीच्या भाषेतले उत्तर ठाकरे यांच्याबरोबर उपस्थित असणाऱ्या आमदार भास्कर जाधव यांनी दिले होते. जाधव यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे राजकीय वातवरण ढवळून निघाले आहे. तसेच त्यांच्यावर सर्व माध्यमातून टीकाही होऊ लागली आहे. त्याचे पडसाद राज्यात सर्व ठिकाणी उमटू लागले आहे. पुण्यातही त्यांच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले.
भास्कर जाधव यांचे वर्तन योग्य नाही - फडणवीस
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात महापूर आला आहे. यामुळे जनतेचा आक्रोश पाहायला मिळतो. मात्र, त्यासाठी अंगावर जाणे योग्य नाही. भास्कर जाधव यांनी केलेले वर्तन योग्य नाही. या घटनेची दखल घेतली गेली पाहिजे. वर्षभरातील तीन मोठ्या घटनेमुळे कोकणवासीय उद्ध्वस्त झाले आहेत. यासाठी आता आऊट ऑफ द बॉक्स जाऊन विचार करायला हवा. कोल्हापूर आणि सांगलीतील महापुरावेळी जीआर बदलून मदत केली होती. तशीच मदत आता करायला हवी, असे देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले.