मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटाच्या सुरक्षेबाबत केंद्रातर्फे संस्थेकडून पाहणी, लवकरच अहवाल सादर करणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2022 16:07 IST2022-11-09T16:07:04+5:302022-11-09T16:07:23+5:30
केंद्र सरकरने नव्या उपाययोजना राबवण्यासाठी टेहरी हायड्रो डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. (टीएचडीसीएल) ही संस्था नियुक्त केली

मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटाच्या सुरक्षेबाबत केंद्रातर्फे संस्थेकडून पाहणी, लवकरच अहवाल सादर करणार
चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील रस्ता अतिवृष्टीमुळे खचल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे काही महिने घाट वाहतुकीस बंद ठेवावा लागला होता. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकरने नव्या उपाययोजना राबवण्यासाठी टेहरी हायड्रो डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. (टीएचडीसीएल) ही संस्था नियुक्त केली आहे. सोमवारी या संस्थेने परशुराम घाटाची तपासणी केली. याबाबतचा अहवाल लवकरच ही संस्था केंद्र सरकारला सादर करणार आहे.
पावसाळ्यात डोंगर खचल्याने परशुराम घाट पावसाळ्यात दीर्घकाळ वाहतुकीसाठी बंद ठेवावा लागला होता. संरक्षक भिंतीसह वेगवेगळ्या उपाययोजना करूनही वाहतूक विस्कळीत होत आहे. त्यामुळेच कोकणात डोंगर भागातून गेलेल्या घाट रस्त्याचे सर्वेक्षण करून त्यावर उपाययोजना सूचवण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी टेहरी हायड्रो डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. (टीएचडीसीएल) या संस्थेला कोकणात पाठवण्याचा निर्णय घेतला.
सोमवारी या संस्थेचे स्ट्रक्चरल इंजिनिअर संदीप रल्लान, आकाश काला या दोन अभियंत्यांनी सुरुवातीला वरंध घाट व नंतर कशेडीची पाहणी केली. ते दुपारी परशुराम येथे दाखल झाले. यावेळी येथील राष्ट्रीय महामार्गचे उपविभागीय अभियंता पी. व्ही. निगडे, यांच्यासह ब्ल्यूम कंपनीचे टीम लीडर संजय रॉय, मुजुमदार यांच्यासह कंत्राटदार कंपनीचे अभियंते उपस्थित होते. परशुराम घाटात माथ्यावरील भागात काही बदल करण्याची गरज त्यांनी बोलून दाखवली. पायथ्याशी योग्य पद्धतीची खबरदारी घेण्यात आली असल्याचे मत त्यांनी नोंदवले. या संपूर्ण घाटाची पाहणी आणि उपाययोजना याबाबतचा अहवाल ते केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाला देणार आहेत.
टेहरी संस्थेचे उत्तराखंडसह देशात मोठे काम
टेहरी या संस्थेचे उत्तराखंडसह देशातील अन्य डोंगराळ भागात मोठे काम आहे. त्या भागात डोंगर खचून होणाऱ्या अपघातावर त्यांनी उपाययोजना सुचवलेल्या आहेत. कोकणातील घाट सुरक्षित व्हावेत, यासाठी त्यांची मदत घेतली जात आहे.