रत्नागिरीतील पोलीस भरतीवर सीसीटीव्हीची नजर, भरती प्रक्रिया सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 17:46 IST2018-03-16T17:46:53+5:302018-03-16T17:46:53+5:30
रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातील पोलीस शिपाई पदाच्या १९४ रिक्त पदांसाठी येथील पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर १२ मार्चपासून भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रक्रियेवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार असून, याशिवाय महत्त्वाच्या सर्व ठिकाणी व्हिडीओ रेकॉर्डिंगसाठी एकूण २५ कर्मचारी नियुक्त केले आहेत.

रत्नागिरीतील पोलीस भरतीवर सीसीटीव्हीची नजर, भरती प्रक्रिया सुरू
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातील पोलीस शिपाई पदाच्या १९४ रिक्त पदांसाठी येथील पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर १२ मार्चपासून भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रक्रियेवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार असून, याशिवाय महत्त्वाच्या सर्व ठिकाणी व्हिडीओ रेकॉर्डिंगसाठी एकूण २५ कर्मचारी नियुक्त केले आहेत.
ही भरती प्रक्रिया संपूर्णपणे पारदर्शक आणि गुणवत्तेवर आधारित असून, उमेदवारांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नये, असे आवाहन पालीस अधीक्षक प्रणय अशोक यांनी केले आहे.
पोलीस भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांची राहण्याची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांची पोलीस मुख्यालयाजवळील बहुउद्देशीय हॉल व रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याजवळील रत्नदुर्ग हॉलमध्ये सोय करण्यात आली आहे. १५ रोजी मैदानी चाचणीसाठी २००० उमेदवारांपैकी १४१२ उमेदवार चाचणीला उपस्थित होते. त्यातील १२१ उमेदवार अपात्र, तर १२९१ उमेदवार पात्र ठरले.
यंत्रणेचा वापर
भरती प्रक्रियेसाठी यावर्षी प्रथमच १०० मीटर व १६०० मीटर धावणाऱ्या उमेदवारांसाठी आर. एफ. आय. डी. यंत्रणेचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे मनुष्यबळही कमी लागणार असून, उमेदवाराने किती वेळात अंतर पार केले, हे तत्काळ व अचूकपणे समजण्यास मदत होणार आहे.