देवरुख-रत्नागिरी मार्गावर भरधाव कार उलटली, सासू-सून ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2022 13:56 IST2022-05-27T13:34:13+5:302022-05-27T13:56:27+5:30
चालकाचा कारवरील ताबा सुटून ती उलटली. यात सासू आणि सून या दोघी ठार झाल्या.

देवरुख-रत्नागिरी मार्गावर भरधाव कार उलटली, सासू-सून ठार
देवरुख : देवरुख - रत्नागिरी मार्गावर वेगात असलेली मारुती स्विफ्ट डिझायर कार पलटी होऊन झालेल्या अपघातात सासू सुनेचा मृत्यू झाला. हा अपघात काल, गुरुवारी मध्यरात्री पावणेबारा वाजण्याच्या सुमारास पाटगाव येथे घडला. दीपिका दीपक सावंत (वय-५०) आणि भागीरथी दगडू सावंत (८५, रा. माळवाशी मावळत वाडी) अशी या मृत महिलांची नावे आहेत.
वाशी तर्फे देवरुख येथे आज, शुक्रवारी मंदिराचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमासाठी सावंत कुटुंबीय मुंबईतील वाशी येथून आपल्या घरी येत होते. स्विफ्ट डिझायर कार (एमएच ०२ सीआर ५२४१) शुभम दीपक सावंत चालवत होता. मध्यरात्रीच्या सुमारास त्यांची गाडी पाटगाव घाटीच्या पुढे हॉटेल हिल पॉईंट येथे आली असता चालकाचा कारवरील ताबा सुटून ती उलटली. गाडी वेगात असल्याने यात सासू आणि सून या दोघी ठार झाल्या.
कारमधून चारजण प्रवास करीत होते. त्यांना घरी पोहचण्यासाठी केवळ अडीच ते तीन किलोमीटर एवढाच प्रवास करायचा बाकी होता. त्यापूर्वीच काळाने त्यांच्यावर घाला घातला आहे. या अपघातामुळे वाडीवर शोककळा पसरली. अपघाताचे वृत्त कळताच देवरुख पोलीस स्थानकाचे निरीक्षक बाळकृष्ण जाधव यांनी आपल्या सहकार्यासह घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. अधिक तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक डी. एस. पवार करीत आहेत.