चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील सावर्डे बाजारपेठ बस स्थानक परिसरात शुक्रवारी पहाटे खासगी आराम बसचा अपघात झाला. पहाटे सव्वाचारच्या सुमारास चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस दुभाजक ओलांडून महामार्गावरील विजेचे खांब तोडत थेट बाजारातील एका दुकानात घुसली. नागरिकांची वर्दळ नसल्याने सुदैवाने जीवितहानी झाली नाही. बस महामार्गावरून दुकानात घुसताना मात्र काही वाहनचालक बालंबाल बचावले.रत्नागिरीहून मुंबईकडे निघालेली आराम बस (एमएच ०८ - सीव्ही ९०८५) सावर्डे येथे आली असताना चालक इतोरी लुइस परेरा (रा. वेंगुर्ला) यांचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यांनी उजव्या बाजूस दुभाजकाला धडक दिली. पुढे विजेच्या खांबाला धडक देत बसथांब्याच्या निवारा शेडचेही नुकसान झाले.
त्यानंतर ही बस रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानात घुसली. या घटनेमुळे परिसरात मोठी धावपळ उडाली. घटनेनंतर महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. स्थानिकांच्या मदतीने बस बाजूला करण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.या अपघातात बस व दुकानाचे मोठे नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. बसथांब्यासह विजेचे खांब व दुकानाचे नुकसान केल्याप्रकरणी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सावर्डे पोलिस अधिक तपास करीत आहेत.