मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडीचा दुसरा बोगदाही खुला, शिमगोत्सवात चाकरमान्यांचा प्रवास होणार सुखकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 16:46 IST2025-03-12T16:42:24+5:302025-03-12T16:46:15+5:30
खेड (जि. रत्नागिरी ) : मुंबई-गोवा महामार्गावरील बहुचर्चित व प्रतीक्षेतील कशेडी घाटाला पर्याय असणारे दोन्ही बोगदे सोमवारी सायंकाळपासून वाहतुकीसाठी ...

मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडीचा दुसरा बोगदाही खुला, शिमगोत्सवात चाकरमान्यांचा प्रवास होणार सुखकर
खेड (जि. रत्नागिरी) : मुंबई-गोवा महामार्गावरील बहुचर्चित व प्रतीक्षेतील कशेडी घाटाला पर्याय असणारे दोन्ही बोगदे सोमवारी सायंकाळपासून वाहतुकीसाठी खुले झाल्याने शिमगोत्सवासाठी गावी येणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होणार आहे.
बोगद्यातील वीजपुरवठा खंडित झाल्यास वाहतूक व्यवस्थेत कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, याकरिता तात्पुरत्या स्वरूपात जनरेटरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. कायमस्वरूपी वीजपुरवठ्यासाठी अनामत रक्कम भरण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
दोन्ही बोगद्यांत कायमस्वरूपी वीजपुरवठा करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग खात्याने महावितरणकडे ११ केव्ही क्षमतेच्या विजेची मागणी केली आहे. त्यासाठी ८० लाख रुपयांची अनामत रक्कम भरणा करण्याची सूचना महावितरणने केली होती. मात्र, अनामत रक्कम भरण्याची प्रक्रिया लांबणीवर पडल्याने शिमगोत्सवात दोन्ही बोगदे पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुले होतील की नाही, याबाबत साशंकता होती.
मात्र, राष्ट्रीय महामार्ग विभागाने दोन्ही बोगद्यांत जनरेटरची सुविधा उपलब्ध करण्यासाठी पुढाकार घेतल्याने दोन्ही बोगद्यांतून वाहतूक सुरू झाली आहे. दोन्ही बोगदे कार्यान्वित झाले असले तरी अजूनही काही कामे अपूर्ण आहेत.
शिमग्यासाठी घाई
मार्चअखेरपर्यंत दोन्ही बोगदे पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, शिमगोत्सवासाठी कोकणाकडे येणाऱ्या गाड्यांची संख्या वाढते. त्यामुळे लगबगीने दोन्ही बोगदे सुरू करण्यात आले आहेत.