प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर कशेडीतील दोन्ही बोगदे होणार खुले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 11:34 IST2025-01-01T11:34:43+5:302025-01-01T11:34:59+5:30
खेड (जि. रत्नागिरी ) : मुंबई-गोवा महामार्गावरील बहुचर्चित आणि प्रतीक्षेत कशेडी घाटाला पर्यायी ठरणारे दोन्ही बोगदे प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर ...

प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर कशेडीतील दोन्ही बोगदे होणार खुले
खेड (जि. रत्नागिरी) : मुंबई-गोवा महामार्गावरील बहुचर्चित आणि प्रतीक्षेत कशेडी घाटाला पर्यायी ठरणारे दोन्ही बोगदे प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुले होणार आहेत. सद्य:स्थितीत दुसऱ्या बोगद्यात पंखे बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. रायगड जिल्ह्याच्या हद्दीत भोगावनजीक एका पुलावर स्लॅब टाकण्याचे कामही सुरू आहे. बोगद्यातील विद्युतीकरणासह इतर प्रलंबित कामे प्रगतिपथावर आहेत.
महामार्गावर सर्वांत अवघड व धोकेदायक असलेला कशेडी घाट अवजड वाहनचालकांना डोकेदुखी ठरला आहे. मात्र, चौपदरीकरणाच्या कामात या घाटाला सुमारे दोन किलाेमीटरचे येण्या-जाण्यासाठी दोन स्वतंत्र बोगदे प्रस्तावित करण्यात आले होते. सद्य:स्थितीत पहिल्या बोगद्यातून दोन्ही बाजूंकडील वाहतूक सुरळीत सुरू आहे.
दुसऱ्या बोगद्यात तात्पुरत्या स्वरूपातील वीजपुरवठा कार्यान्वित करण्यात आला होता. कायमस्वरूपी वीजपुरवठ्यासाठी विद्युतीकरणाचे काम हाती घेण्यात आल्याने २२ सप्टेंबरपासून दुसऱ्या बोगद्यातील वाहतूक थांबविण्यात आली आहे. विद्युतीकरणाची कामे जवळपास पूर्ण झाल्यावर दोन्ही बोगदे पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुले होतील. या बोगद्यात १० पंखे बसवण्याचे काम हाती घेतले आहे. येत्या २० ते २५ दिवसांत बोगद्यातील कामे पूर्ण होतील.
मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्यातून पूर्ण क्षमतेने सुरक्षित व वेगवान करण्याच्या दृष्टीने प्रशासन कसोशीने प्रयत्न करीत आहे. नवीन वर्षात २६ जानेवारीपासून दोन्ही बोगदे पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुले होतील. - पंकज गोसावी, अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग.