Ratnagiri- मुंबई-गोवा महामार्गावरील कामथे घाटात तरुणाचा मृतदेह आढळला, घातपाताची शक्यता
By संदीप बांद्रे | Updated: April 1, 2023 13:27 IST2023-04-01T13:27:08+5:302023-04-01T13:27:30+5:30
मृतदेहाच्या अंगावर जखमा असल्याने हा घातपात असावा असा अंदाज

Ratnagiri- मुंबई-गोवा महामार्गावरील कामथे घाटात तरुणाचा मृतदेह आढळला, घातपाताची शक्यता
चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कामथे घाटात आज, शनिवारी सकाळी तरुणाचा मृतदेह आढळून आला. त्याच्या अंगावर जखमा दिसत असून अंग रक्ताने माखलेले आहे. त्यामुळे घातपाताची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली. संबंधित तरुणाची अद्याप ओळख पटलेली नाही.
कामथे घाटात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मोठ्या वळणावर ही घटना उघडकीस आली आहे. कामथे येथील रहिवासी व सामाजिक कार्यकर्ते समीर काझी हे सावर्डेत जात असताना त्यांना कामथे घाटात दुर्गंधीयुक्त वास आला. यावेळी त्यांनी घटनास्थळी पाहणी केली असता एका तरुणाचा मृतदेह आढळला. त्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक रवींद्र शिंदे यांनी व सहकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी केली.
जखमी अवस्थेत असलेला मृतदेह फुगलेल्या व कुजलेल्या स्थितीत आहे. त्यामुळे ही घटना तीन चार दिवसांपूर्वीची असावी असा अंदाज आहे. मृतदेहाच्या अंगावर जखमा असल्याने हा घातपात असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेची माहिती मिळताच अनेकांनी कामथे घाटात धाव घेतली आहे. मृतदेहाच्या अंगात सफेद शर्ट व जीन्स पॅन्ट असून व्यक्तीचा गव्हाळ रंग असे वर्णन आहे.