Ratnagiri: विहिरीत पडलेल्या ‘ब्लॅक पँथर’ची तब्बल ३४ तासांनी सुटका, आक्रमक झाल्याने रेस्क्यू करणे होते धोक्याचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 13:41 IST2026-03-23T13:40:52+5:302026-03-23T13:41:22+5:30

पुन्हा नैसर्गिक अधिवासात साेडले

Black Panther rescued after 34 hours in Ratnagiri well | Ratnagiri: विहिरीत पडलेल्या ‘ब्लॅक पँथर’ची तब्बल ३४ तासांनी सुटका, आक्रमक झाल्याने रेस्क्यू करणे होते धोक्याचे

Ratnagiri: विहिरीत पडलेल्या ‘ब्लॅक पँथर’ची तब्बल ३४ तासांनी सुटका, आक्रमक झाल्याने रेस्क्यू करणे होते धोक्याचे

पावस : रत्नागिरी तालुक्यातील कोळंबे खांबाचा मळा येथील बागेत असणाऱ्या विहिरीत पडलेल्या ‘ब्लॅक पँथर’ला अखेर ३४ तासांनी विहिरीबाहेर काढण्यात वन विभागाला यश आले आहे. विहिरीच्या पाण्यात मृत्यूशी झुंज देणारा हा ‘ब्लॅक पँथर’ सुखरूप असून, त्याला नैसर्गिक अधिवासात साेडण्यात आले.

एका वासराचा पाठलाग करत असताना हा ‘ब्लॅक पँथर’ अंधारात विहिरीचा अंदाज न आल्याने वासरासह त्यात कोसळला. यात वासराचा मृत्यू झाला . ब्लॅक पँथरला विहीर खोल असल्याने बाहेर पडणे अशक्य झाले होते. विहिरीत कडेला असलेल्या एका छोट्याशा जागेचा आधार घेत त्याने स्वतःचा जीव वाचविण्याचा प्रयत्न केला.

ही घटना दिनेश भागवत यांच्या बागेत काम करणाऱ्या कामगारांना शनिवारी (दि. २१) सकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान लक्षात आली. याबाबत काेळंबे गावच्या पोलिस पाटील समीक्षा हातिसकर यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी वन विभागाला माहिती दिली. त्यानंतर रत्नागिरी परिक्षेत्राचे वन अधिकारी प्रकाश सुतार आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले.

ब्लॅक पँथरला बाहेर काढणे हे एक मोठे आव्हान होते. ताे प्रचंड घाबरलेला आणि आक्रमक होता. त्यामुळे थेट रेस्क्यू करणे धोक्याचे होते. वन विभागाच्या पथकाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आणि त्याला इजा होऊ नये म्हणून विहिरीत एक विशेष पिंजरा सोडला. ‘ब्लॅक पँथर’ला पिंजऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी लाकडी ओंडके आणि शिडीचा आधार देण्यात आला, जेणेकरून तो स्वतःहून पिंजऱ्यात प्रवेश करेल.

तब्बल ३४ तास त्याच्यावर लक्ष ठेवण्यात आले हाेते. अखेर भुकेलेला आणि थकलेला ‘ब्लॅक पँथर’ रविवारी (दि. २२) सायंकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान सुरक्षिततेच्या शोधात पिंजऱ्यात शिरला आणि बचाव पथकाने तत्काळ पिंजरा वर ओढला.

‘ब्लॅक पँथर’ला बाहेर काढल्यानंतर वनविभागाच्या डॉक्टरांनी त्याची प्राथमिक वैद्यकीय तपासणी केली. त्याला कोणतीही गंभीर इजा झालेली नसून त्याला काही काळ निरीक्षणाखाली ठेवल्यानंतर, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार पुन्हा नैसर्गिक अधिवासात साेडण्यात आले.

विहिरीत साेडले तेरा हजार लिटर पाणी

‘ब्लॅक पँथर’ पडलेल्या विहिरीची उंची सुमारे ५० फूट हाेती, तर दाेन ते तीन फूट पाणी हाेते. पाणी कमी असल्याने त्याला बाहेर काढणे शक्य हाेत नव्हते. त्यामुळे विहिरीत आणखी पाणी टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी रत्नागिरीतून दाेन टँकर मागविण्यात आले. त्यातून १३ हजार लिटर पाणी विहिरीत साेडण्यात आले. पाण्याची पातळी वाढताच ‘ब्लॅक पँथर’ पिंजऱ्यात आला.

पाण्यासाठी ३०० मीटरचा पाईप

ही विहीर रस्त्यापासून दूरवर असून, त्याठिकाणी टँकर पोहोचणे शक्य नव्हते. त्यामुळे वन विभागाने जोपर्यंत टँकर येऊ शकेल, तिथपर्यंत ताे नेला. त्यानंतर पुढे ३०० मीटर लांब पाईप जाेडून विहिरीत पाणी साेडण्यात आले.

अधिकाऱ्यांचा रात्रभर पहारा

वन विभागाने शनिवारी सकाळी १० वाजल्यापासून ’रेस्क्यू ऑपरेशन’ सुरू केले हाेते. ‘ब्लॅक पँथर’ला पकडण्यासाठी पिंजरा साेडण्यात आला हाेता. मात्र, ताे पिंजऱ्यात काही आला नाही. शनिवारी रात्रभर ताे विहिरीतच राहिल्याने वन विभागाचे अधिकारी त्याच्यावर रात्रभर लक्ष ठेवून हाेते.

Web Title : रत्नागिरी: 34 घंटे बाद कुएं से निकाला गया ब्लैक पैंथर।

Web Summary : रत्नागिरी में शिकार करते समय एक ब्लैक पैंथर कुएं में गिर गया। 34 घंटे के बचाव अभियान के बाद, वन विभाग ने पिंजरे का उपयोग करके पैंथर को सुरक्षित रूप से बाहर निकाला। पशु को बिना नुकसान पहुंचाए पाया गया और चिकित्सा जांच के बाद उसे वापस उसके प्राकृतिक आवास में छोड़ दिया गया।

Web Title : Black Panther rescued from well in Ratnagiri after 34 hours.

Web Summary : A black panther fell into a well while chasing prey in Ratnagiri. After a 34-hour rescue operation, the forest department safely extracted the panther using a cage. The animal was found unharmed and released back into its natural habitat after a medical checkup.