काेकण रेल्वे मार्गावरील गाड्यांचा वेग आजपासून मंदावणार, काही गाड्यांच्या वेळा बदलल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2024 14:03 IST2024-06-10T14:03:27+5:302024-06-10T14:03:53+5:30
रत्नागिरी : मुसळधार पाऊस आणि दरडींचा धाेका लक्षात घेऊन काेकण रेल्वे मार्गावरील गाड्यांसाठी आज, साेमवारपासून पावसाळी वेळापत्रक लागू हाेणार ...

काेकण रेल्वे मार्गावरील गाड्यांचा वेग आजपासून मंदावणार, काही गाड्यांच्या वेळा बदलल्या
रत्नागिरी : मुसळधार पाऊस आणि दरडींचा धाेका लक्षात घेऊन काेकण रेल्वे मार्गावरील गाड्यांसाठी आज, साेमवारपासून पावसाळी वेळापत्रक लागू हाेणार आहे. हे वेळापत्रक ३१ ऑक्टाेबरपर्यंत लागू राहणार असून, गाड्यांचा वेगही मंदावणार आहे. नवीन वेळापत्रकानुसार गाड्या अर्धा ते एक तास लवकर धावणार आहेत.
पावसाळ्यात कोकण रेल्वे मार्गावर दरड कोसळणे, मार्गावर चिखल व माती येणे, पावसाचे पाणी येऊन मार्ग विस्कळीत होणे अशा बाबी घडू शकतात. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावर दरवर्षी १० जून ते ३१ ऑक्टोबर या कालावधीसाठी गाड्यांसाठी पावसाळी वेळापत्रक आखले जाते. त्यानुसार काही गाड्यांच्या वेळा बदलल्या जातात.
कोकण रेल्वे मार्गावर धावणारी तेजस एक्स्प्रेस, वंदे भारत एक्स्प्रेस आठवड्यातून तीन दिवस चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इतरवेळी वंदे भारत सहा दिवस, तर तेजस एक्स्प्रेस आठवड्यातून पाच दिवस चालवली जाते. तसेच, लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगावदरम्यान धावणारी एक्स्प्रेस आठवड्यातून दोनच दिवस चालविण्यात येते. काेकणकन्या, तुतारी एक्स्प्रेस, वंदे भारत, मडगाव-मुंबई मांडवी एक्स्प्रेस, मडगाव-मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस या गाड्या नवीन वेळापत्रकानुसार अर्धा ते एक तास लवकर धावणार आहेत.