थाटात बारसं झालं; दूध पिऊन बाळ झोपलं, अन्..; रत्नागिरीतील ह्रदयद्रावक घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 15:27 IST2025-10-31T15:26:52+5:302025-10-31T15:27:25+5:30
दोन दिवसांत दुसऱ्या तान्हुल्याचा मृत्यू

थाटात बारसं झालं; दूध पिऊन बाळ झोपलं, अन्..; रत्नागिरीतील ह्रदयद्रावक घटना
रत्नागिरी : घरात बाळ आलं, म्हणून सगळे आनंदात होते. त्या आनंदमय वातावरणात थाटात बाळाचं बारसं झालं. नीरव असं नाव मिळालं त्याला; पण फक्त थोड्याच तासांसाठी. बारसं झालं आणि रात्री १२ वाजण्याच्या सुमारास दूध पिऊन हे बाळ झोपलं ते परत उठलेच नाही. झोपेतच केव्हातरी त्याने शेवटचा श्वास घेतला असावा. कुणालाही चटका बसेल, असा हा प्रकार बुधवारी रत्नागिरीत घडला आहे.
रत्नागिरीतील एका दाम्पत्याला मुलगा झाला. सगळेजण खूप आनंदात होते. बाळ आणि त्याची आई रुग्णालयातून घरी आले. अत्यंत आनंदात या कुटुंबाने बाळाचं बारसं केलं आणि बाळाचं नाव नीरव ठेवलं. मंगळवार, दि. २८ रोजी सायंकाळी ६ वाजता हे बारसं झालं. नातेवाईक, मित्रमंडळी आली होती. रात्री साडेअकरा-बारा वाजता सर्व कार्यक्रम आटोपला. १२ वाजता नीरव खेळत होता. मध्यरात्रीनंतर दोन वाजता नीरव दूध प्यायला आणि झोपला.
बुधवार, दि. २९ रोजी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास तान्हुल्या नीरवच्या आईला जाग आली. त्यावेळी नीरवचे अंग गार पडले असल्याचे आणि त्याच्या नाकातून रक्त येत असल्याचे तिच्या लक्षात आले. तातडीने नीरवला माळनाका येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथून दुसऱ्या आणि त्यानंतर तिसऱ्या रुग्णालयात नेण्यात आले. तेथून नीरवला शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासले. मात्र, दुर्दैवाने तोपर्यंत त्याची प्राणज्योत मालवली होती. तान्हुल्याच्या अशा जाण्याने सगळ्यांनाच चटका बसला आहे.
दोन दिवसांत दुसऱ्या तान्हुल्याचा मृत्यू
दुर्दैवाने दोनच दिवसांपूर्वी चिपळूण तालुक्यातही दोन दिवसांच्या तान्ह्या बाळाचा मृत्यू झाला आहे. मोजून दोन दिवस एवढेच वय असलेलं ते बाळ रात्री दूध पिऊन झाेपले आणि पहाटे ते गार पडलेले होते. त्यापाठोपाठ आता रत्नागिरीतही अशी दुर्दैवी घटना घडली आहे.