रत्नागिरीत तरुणावर तलवारीने वार, मित्राशी झालेल्या वादातून हल्ला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2022 19:23 IST2022-06-07T19:23:04+5:302022-06-07T19:23:44+5:30
हल्ला नेमका का व कुणी केला, याचा शोध पोलीस घेत आहेत.

रत्नागिरीत तरुणावर तलवारीने वार, मित्राशी झालेल्या वादातून हल्ला?
रत्नागिरी : शहरानजीकच्या क्रांतीनगर येथे एका तरुणावर तलवारीने पाच वार झाल्याची घटना सोमवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडली. राजेंद्र शिवाजी विटकर (२७, रा. क्रांतीनगर) असे वार झालेल्या तरुणाचे नाव आहे. दाेघे हल्लेखाेर दुचाकीवरुन आले आणि त्यांनी राजेंद्रवर वार केले. या दाेघांचा शाेध पाेलीस घेत आहेत.
राजेंद्र याच्यावर हा हल्ला नेमका का व कुणी केला, याचा शोध पोलीस घेत आहेत. हल्ला करणाऱ्याचे नाव सांगितल्याने पोलीस त्याचा शोध घेत आहेत. राजेंद्रची तब्येत चिंताजनक असल्याने त्याला कोल्हापूर येथे हलवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत होते.
सोमवारी दुपारी राजेंद्र आणि त्याच्या मित्राची वादावादी झाली होती. या वादावादीमुळेच हा हल्ला झाला आहे का, याचा तपास आता पोलीस घेत आहेत. शहरातील क्रांतीनगर भागात तरुणावर तलवारीने वार झाल्याची बातमी शहरात पसरताच एकच खळबळ उडाली आहे. हा हल्ला काेणी केला, याची चर्चा शहरातील नाक्या नाक्यावर सुरु हाेती.
ही घटना समजताच उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे, प्रभारी शहर पोलीस निरीक्षक शिरीष सासने, सहायक पोलीस उपनिरीक्षक भगवान पाटील यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी व पंचनामा केला. आरोपीला पकडण्यासाठी तत्काळ हालचालीही सुरू करण्यात आल्या आहेत.