संदीप बांद्रेचिपळूण : एकीकडे जिल्हा परिषदशाळांमध्ये पहिलीपासून सेमी इंग्रजी सुरू करण्याचा अट्टाहास सुरू आहे. तर दुसरीकडे चिपळूण तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या तब्बल ३९ मराठी शाळांना गळती लागल्याची विदारक स्थिती समोर आली आहे. या शाळांची वेळीच दुरूस्ती न झाल्याने विद्यार्थ्यांना गळक्या वर्गात बसून शिक्षणाचे धडे गिरवावे लागत आहेत.खासगी शाळांच्या तुलनेत विद्यार्थी पटसंख्या वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न होत असले तरी आजही जिल्हा परिषद शाळांची परिस्थिती अत्यंत बिकट व जैसे थे आहे. मे महिन्याच्या सुटीनंतर १६ जूनपासून नव्या शैक्षणिक सत्राला सुरुवात झाली आहे; मात्र नादुरुस्त शाळांची दुरुस्ती न केल्याने गळक्या शाळांमध्ये वर्ग भरत आहेत. शाळांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव त्या-त्या शाळांनी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडे पाठवले आहेत; मात्र ते लालफितीत अडकून पडले आहेत.लोकसभा निवडणुकीदरम्यान काही शाळांमध्ये मतदान केंद्र हाेते. त्यामुळे काही नादुरुस्त शाळा तातडीने दुरुस्त केल्या होत्या. तरीही तालुक्यातील ३९ शाळा अजूनही नादुरुस्त असून, त्याच्याच छताखाली विद्यार्थ्यांना शिकावे लागत आहे.
या शाळा नादुरुस्तजिल्हा परिषद शाळा गोंधळे, हडकणी, कोळकेवाडी जांबराई, गोवळकोट मराठी शाळा, मुर्तवडे क्रमांक २, कळंबट ब्राह्मण गव्हाळवाडी, उमरोली क्रमांक १, चिपळूण कन्या शाळा, पाग मुलांची शाळा, असुर्डे बनेवाडी, मार्गताम्हाणे, दहिवली खुर्द, कापरे देऊळवाडी, गांग्रई गावणंवाडी क्रमांक १, पाचाड क्रमांक १, गुळवणे, कुंभार्ली क्रमांक १, मांडकी खुर्द, राधा नगर, वीर क्रमांक ४, खांदाट पुनर्वसन, विद्यामंदिर सती, पोफळी ऐनाचेतळे, नांदिवसे गावठाण, कामथे क्रमांक २, पिलवली तर्फ वेळंब, खेरशेत क्रमांक २, टाकेवाडी, कोळकेवाडी हसरेवाडी, कोळकेवाडी पठारवाडी, कोसबी घाणेकरवाडी, आगवे क्रमांक १, असुर्डे क्रमांक ३, बोरगाव क्रमांक १, उभळे क्रमांक २, नांदिवसे लुगडेवाडी.
जिल्हा परिषदेच्या नादुरुस्त शाळांच्या इमारत दुरुस्तीचा प्रस्ताव यापूर्वीच जिल्हास्तरावर पाठवण्यात आला आहे. अपेक्षित खर्चही त्यासोबत कळवला असून, त्याचा पाठपुरावा सातत्याने घेतला जात आहे. - प्रदीपकुमार शेडगे, गटशिक्षणाधिकारी, चिपळूण.