Ratnagiri: राजापूर तालुक्यातील अर्जुना धरण भरले, पर्यटकांना प्रवेश बंदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 17:02 IST2025-07-11T17:02:05+5:302025-07-11T17:02:30+5:30
यंदा अधिक जलसाठा

Ratnagiri: राजापूर तालुक्यातील अर्जुना धरण भरले, पर्यटकांना प्रवेश बंदी
पाचल : राजापूर तालुक्यातील मौजे करक येथील अर्जुना मध्यम प्रकल्पातील अर्जुना धरण गुरुवारी पहाटे ५:३० वाजता पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्यामुळे धरणाच्या सांडव्यावरून ३.५ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरणात सध्या २.६४ टीएमसी एवढा पाणीसाठा असून, २,०२३ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, धरण परिसरात पर्यटकांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.
या धरण परिसराची पाहणी कार्यकारी अभियंता विवेक सोनार यांनी उपविभागीय अभियंता व क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत केली. धरण व त्याची इतर उपसंरचना सुस्थितीत असून, परिसरात सीसीटीव्हीच्या निगराणीखाली नियंत्रण ठेवण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
सांडव्यावरून होणाऱ्या विसर्गामुळे अर्जुना नदीच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच, अर्जुना धरण हे प्रतिबंधित क्षेत्र असल्याने पर्यटकांना प्रवेशास मनाई करण्यात आली आहे.
यंदा अधिक जलसाठा
गतवर्षी ७ जुलै २०२४ रोजी हे धरण भरले होते. त्यावेळी केवळ १,३२० मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. त्याचवर्षी १ जूनला पाणीसाठा ७५ टक्के होता. तर, ५,४५५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. या वर्षी आताच २०२३ मिलिमीटर पावसाची नाेंद झाली आहे.