हातखंबा येथे पुन्हा अपघात, गॅसवाहू टँकर वडापावच्या टपरीवर आदळला; ग्रामस्थांनी महामार्ग अडवला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 10:37 IST2025-08-04T10:32:55+5:302025-08-04T10:37:38+5:30
गॅसवाहू टँकर वडापावच्या टपरीमध्ये घुसल्याची आणि त्याने दोन ते तीन दुचाकी चिरडल्याची घटना सोमवारी सकाळी आठ ते सव्वाआठच्या सुमारास मुंबई गोवा महामार्गावरील हातखंबा येथे घडली.

हातखंबा येथे पुन्हा अपघात, गॅसवाहू टँकर वडापावच्या टपरीवर आदळला; ग्रामस्थांनी महामार्ग अडवला
रत्नागिरी : गॅसवाहू टँकर वडापावच्या टपरीमध्ये घुसल्याची आणि त्याने दोन ते तीन दुचाकी चिरडल्याची घटना सोमवारी सकाळी आठ ते सव्वाआठच्या सुमारास मुंबई गोवा महामार्गावरील हातखंबा येथे घडली. त्यामुळे संतप्त झालेल्या रास्ता रोको केला असून, महामार्गावरील वाहतूक थांबली आहे.
गेल्याच आठवड्यात हातखंबा येथे गॅस वाहू टँकर उलटला होता. त्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. सोमवारची सकाळही या भागासाठी त्रासदायक ठरली. हातखंबा हायस्कूलच्या बाहेरच्या बाजूला एका वडापावच्या टपरीवरच हा गॅसचा टँकर घुसला. त्याने टपरीची पूर्ण मोडतोड झाली आणि दोन ते तीन दुचाकी टँकर खाली चिरडल्या. त्यामुळे लोकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या घटनेची माहिती कळताच असंख्य ग्रामस्थ घटनास्थळी गोळा झाले आणि त्यांनी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू केली आहे. त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावर हातखंबा येथे पुन्हा एकदा वाहतूक ठप्प झाली आहे.
नशीब मुले बाहेर नव्हती
हायस्कूलमधील मुले मधल्या सुट्टीत या वडापावच्या टपरीवर वडापाव खाण्यासाठी येतात. सुदैवाने आज मुख्याध्यापिकांनी मुलांना बाहेर सोडले नव्हते. त्यामुळे मोठी दुर्घटना टाळली.