गणपतीपुळेत अंगारकी यात्रोत्सव, दर्शनासाठी पहाटे ३:३० वाजता मंदिर खुले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2023 14:19 IST2023-01-10T14:18:48+5:302023-01-10T14:19:29+5:30
या वर्षातील एकमेव अंगारकीचा योग असल्याने भाविकांची गर्दी

गणपतीपुळेत अंगारकी यात्रोत्सव, दर्शनासाठी पहाटे ३:३० वाजता मंदिर खुले
गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथे आज, मंगळवारी (दि.१०) अंगारकी यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी एकमेव अंगारकीचा योग जुळून आल्याने यात्रेसाठी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून बहुसंख्य भाविक स्वयंभू ‘श्रीं’च्या दर्शनासाठी उपस्थिती राहू शकतील, असा अंदाज आहे.
अंगारकी यात्रा उत्सवासाठी कोल्हापूर, सांगली, सातारा, कराड, इस्लामपूर, कवठेमहांकाळ, मिरज आदी ठिकाणांहून लाखो भाविक दर्शनासाठी दाखल होतात. घाटमाथ्यावरील काही निवडक गणेश मंडळांकडून भाविकांसाठी खिचडी प्रसाद व महाप्रसादाचे वाटपही केले जाते. यावर्षी २०२३ या वर्षातील एकमेव अंगारकीचा योग असल्याने भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे.
भाविकांना दर्शन मिळण्यात कोणतीही अडचण ये मंदिर परिसरात दर्शन रांगेची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच दर्शन रांगेच्या ठिकाणी भाविकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, तसेच दर्शन रांगा व मंदिर परिसर, समुद्रकिनारा परिसरात विद्युतव्यवस्था करण्यात आली आहे.
पहाटे ३:३० वाजता मंदिर खुले
अंगारकी यात्रोत्सवासाठी स्वयंभू ‘श्रीं’चे मंदिर पहाटे ३:३० वाजता दर्शनासाठी खुले करण्यात आले. प्रारंभी मंदिराचे मुख्य पुजारी अमित घनवटकर व त्यांचे सहकाऱ्यांकडून पूजाअर्चा करण्यात आली. त्यानंतर आरती झाल्यानंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिरात सोडण्यात आले.
कडक बंदोबस्त
अंगारकी यात्रोत्सवासाठी गणपतीपुळे देवस्थान समिती, गणपतीपुळे ग्रामपंचायत व जयगड पोलिस स्थानक सज्ज आहेत. एकूण २२ पोलिस अधिकारी व १७५ पोलिस कर्मचारी तसेच ३० राखीव पोलिस दलाचे कर्मचारी गणपतीपुळे परिसरात तैनात आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याकडे लक्ष ठेवण्यात येणार आहे.