All the roads in Ratnagiri district became uninhabited | रत्नागिरी जिल्ह्यातील सारेच रस्ते झाले निर्मनुष्य

रत्नागिरी जिल्ह्यातील सारेच रस्ते झाले निर्मनुष्य

ठळक मुद्देठिकठिकाणी तपासणी नाके, अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने बंद अनावश्यक फिरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा

रत्नागिरी : कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी शासनाने जाहीर केलेल्या विकेंड लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी रत्नागिरीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अत्यावश्यक सेवेतील दुकान वगळता सर्वच दुकाने बंद ठेवण्यात आल्याने जिल्ह्यातील सर्व बाजारपेठा बंद होत्या. त्यामुळे जिल्हाभरातील सारेच रस्ते शनिवारी सकाळपासून निर्मनुष्य झाले होते.

कोरोनाचा संसर्ग वेगाने होऊ लागल्याने शासनाने विकेंड लॉकडाऊन जाहीर केला आहे. शासनाच्या निर्दशानुसार शुक्रवारी रात्री ८ वाजल्यापासून ते सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्व दुकाने बंद ठेवण्यास सांगितले आहे. त्यामुळे शनिवार आणि रविवार दोन दिवस पाळण्यात येणाऱ्या विकेंड लॉकडाऊनला रत्नागिरी जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनीही चांगला प्रतिसाद दिला आहे. मंडणगड ते राजापूरपर्यंत सर्वच तालुक्यातील दुकाने बंद ठेवण्यात आल्याने बाजारपेठा शांत झाल्या होत्या. अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता अन्य कोणतेच वाहन रस्त्यावर फिरताना दिसत नव्हते. जिल्ह्यातील सर्वच शहरांमध्ये शुकशुकाट दिसत होता.

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील महत्वाच्या नाक्यांवर शुक्रवारी रात्रीपासूनच बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ठिकठिकाणी बॅरिकेटस् लावून प्रत्येक वाहनांची तपासणी करण्यात येत होती. विनाकारण रस्त्यांवर फिरणाऱ्यांवर कारवाईचा बडगाही उगारण्यात आला होता. रत्नागिरी शहरात मारूती मंदिर परिसरात उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे, शहर पोलीस निरीक्षक विनीत चौधरी आपल्या सहकाऱ्यांसह उभे होते.

शनिवारी सकाळपासून प्रत्येक भागातून येणाऱ्या वाहनचालकांची तपासणी करण्यात येत होती. तसेच जिल्ह्यात परजिल्ह्यातून येणाऱ्या वाहनांचीही पोलिसांकडून तपासणी करण्यात येत होती. रत्नागिरी - कोल्हापूर मार्गावरील मुर्शी पोलीस नाका, चिपळूण - कऱ्हाड मार्गावरील कुंभार्ली, राजापूर - कोल्हापूर मार्गावरील अणुस्कुरा, मुंबई - गोवा महामार्गावरील कशेडी घाट येथे पोलीस तैनात ठेवण्यात आले होते.

Web Title: All the roads in Ratnagiri district became uninhabited

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.