सर्व फलक मराठीत लागले पाहिजेत, मंत्री उदय सामंत यांची प्रशासनाला सूचना
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 12:42 IST2025-01-13T12:42:06+5:302025-01-13T12:42:21+5:30
रत्नागिरी : जिल्ह्यातील सर्व व्यापारी, खासगी कार्यालये आणि सर्व शासकीय कार्यालयामधील सर्व फलक मराठीत लावले पाहिजेत. २७ फेब्रुवारीला मराठी ...

सर्व फलक मराठीत लागले पाहिजेत, मंत्री उदय सामंत यांची प्रशासनाला सूचना
रत्नागिरी : जिल्ह्यातील सर्व व्यापारी, खासगी कार्यालये आणि सर्व शासकीय कार्यालयामधील सर्व फलक मराठीत लावले पाहिजेत. २७ फेब्रुवारीला मराठी भाषा गाैरव दिन साजरा करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने सर्वांनी समन्वयाने मराठी फलक लावण्यासाठी काम करण्याची सूचना दिल्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयाेजित केलेल्या पत्रकार परिषदेत मंत्री सामंत यांनी मराठी भाषा विभागाच्या बैठकीची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात आला आहे. १४ जानेवारी ते २८ जानेवारीपर्यंत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे. त्यामध्ये तीन कार्यक्रम घेण्यात येत असून, पहिला कार्यक्रम मालगुंड येथील केशवसूत स्मारक येथे हाेईल, दुसरा कार्यक्रम जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थेमध्ये आणि प्रत्येक तालुक्यात कार्यक्रम होणार आहे. त्याबाबतच्या कार्यक्रमाची रचना करण्याची सूचना भाषा अधिकाऱ्यांना दिल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले.
राज्य शासनाने मराठी भाषेबाबत जो अध्यादेश काढला आहे. त्याची तंतोतंत अंमलबजावणी जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांनी केली पाहिजे. २७ फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन आहे. या दिवशी जिल्ह्यातील सर्व फलक मराठी भाषेमध्ये असतील असे काम करण्याच्या सूचना आपण प्रशासनाला दिल्या आहेत. शासकीय कार्यालयांमध्येही मराठीत फलक असले पाहिजेत, अशा प्रकारच्या सूचना दिल्याचेही त्यांनी सांगितले.
मराठीच्या बाबतीत काही अन्यायकारक झाले तर त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आणि अद्दल घडवण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरावर समिती कार्यरत आहे. या समितीने काही कठोर निर्णय घेणे गरजेचे आहे. ९० दिवसांतून एकदा बैठक घेण्याच्या सूचनाही त्यांना देण्यात आलेल्या आहेत, असे मंत्री सामंत म्हणाले.