दुर्दैवी ! काजुच्या बागेत वणवा विझविण्यासाठी गेलेल्या वृद्धाचा होरपळून मृत्यू
By मनोज मुळ्ये | Updated: February 21, 2023 14:27 IST2023-02-21T14:27:04+5:302023-02-21T14:27:43+5:30
रत्नागिरी तालुक्यातील हातखंबा तारवेवाडी येथील घटना. गोविंद विश्राम घवाळी (६६) असे त्यांचे नाव आहे.

दुर्दैवी ! काजुच्या बागेत वणवा विझविण्यासाठी गेलेल्या वृद्धाचा होरपळून मृत्यू
रत्नागिरी : काजूच्या बागेमध्ये लागलेला वणवा विझविण्यासाठी गेलेल्या वृद्धाचा त्या आगीत होरपळून मृत्यू झाल्याचा प्रकार मंगळवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी तालुक्यातील हातखंबा तारवेवाडी येथे झाला. गोविंद विश्राम घवाळी (६६) असे त्यांचे नाव आहे.
सर्वसाधारणपणे दरवर्षी या दिवसात वणवे लागण्याचे प्रमाण वाढते. कडक उन्हामुळे सुकलेले गवत आणि झाडांची वाळलेली पाने यामुळे आग झपाट्याने पसरते आणि त्यात बागा भक्ष्यस्थानी पडतात. साधारण असाच प्रकार हातखंबा तारवेवाडी येथे घडला असल्याची माहिती पुढे येत आहे. काजूच्या एका बागेला सकाळी वणवा लागला. आग आटोक्यात आणण्यासाठी अनेक लोकांनी धाव घेतली. गोविंद घवाळीही त्यात होते. मात्र या आगीत होरपळून त्यांचा मृत्यू झाला आहे. पोलिस पाटील, सरपंच तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनाही या घटनेची माहिती दिली आहे.