Accused escaped after biting police | पोलिसाला चावून पळालेला आरोपी गजाआड

पोलिसाला चावून पळालेला आरोपी गजाआड

ठळक मुद्देपोलिसाला चावून पळालेला आरोपी गजाआडरत्नागिरीतील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांची कारवाई

रत्नागिरी : तुरुंगातून नुकताच सुटलेला आरोपी संशयितरित्या फिरताना दिसल्याने गस्त घालणाऱ्या पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी पोलिसाच्या हाताला चावा घेऊन पळण्यात यशस्वी झालेल्या आरोपीला १४ दिवसांत पुन्हा पकडण्यात रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. हेमंत पांडुरंग देसाई (२९, रा. कांदिवली, मुंबई) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव असून, ही घटना १९ फेब्रुवारी २०२१ रोजी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास घडली होती.

रत्नागिरी शहर पोलीस स्थानकाच्या हद्दीत पोलीस अंमलदार प्रवीण कृष्णा खांबे हे त्यांच्या सहकाऱ्यांसोबत गस्त घालत होते. त्याचवेळी सन्मित्रनगर ते उद्यमनगर रस्त्यावरील ओसवालनगर येथे नुकताच तुरंगातून सुटलेला आरोपी हेमंत देसाई संशयितरीत्या दिसला. पोलिसांनी चौकशीसाठी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने पोलिसाच्या डोक्यावर दगड मारला. मात्र, प्रसंगावधान राहून तो दगड त्यांनी चुकविला.

त्याचवेळी तो पळून जाऊ नये यासाठी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी हेमंतने प्रवीण खांबे यांच्या डाव्या हाताच्या मनगटावर चावा घेऊन पोलिसांचीच दुचाकी चोरून पळाला होता. याबाबत शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होता. त्याच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे खास पथक तयार करण्यात आले होते. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार हेमंत देसाई ग्रामीण पोलीस स्थानकाच्या हद्दीतील खेडशी येथे तो येणार असल्याची माहिती मिळाली.

रेल्वे स्थानक ते हातखंबा मार्गावर गस्त घालत असताना खेडशी येथील चाँदसूर्या येथे हेमंत देसाई याला पकडण्यात आले. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा, पोलीस उपनिरीक्षक विनायक नरवणे, पोलीस हेडकॉन्स्टेबल मिलिंद कदम, आशिष शेलार, पोलीस नाईक बाळू पालकर, रमिज शेख, अमोल भोसले, सत्यजित दरेकर, चालक दत्तात्रय कांबळे यांनी ही कामगिरी केली.

आतापर्यंत १६ गुन्हे दाखल असलेला संशयित

हेमंत देसाई हा मूळचा देऊड (ता. रत्नागिरी) येथील राहणारा आहे. त्यामुळे त्याचे मूळ गावी येणे जाणे असते. त्याच्यावर यापूर्वी रत्नागिरी जिल्ह्यात चोरीचे एकूण ५ गुन्हे दाखल आहेत. तसेच मुंबई परिसरात खुनाचा प्रयत्न, घरफोडी, चोरी व सरकारी कामात अडथळा यासारखे ११ गुन्हे दाखल आहेत.

Web Title: Accused escaped after biting police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.