Ratnagiri: नदीपलीकडे भाजी आणायला गेला, तरुणाचा बुडून मृत्यू झाला; आधारच हरपल्याने कुटुंब झाले पोरके
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 12:24 IST2025-11-04T12:22:48+5:302025-11-04T12:24:36+5:30
पोहता येत नसतानाही पाण्यात मारली उडी

Ratnagiri: नदीपलीकडे भाजी आणायला गेला, तरुणाचा बुडून मृत्यू झाला; आधारच हरपल्याने कुटुंब झाले पोरके
देवरुख : नदीपलीकडील शेतात असणारी भाजी आणण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला. देवरुखमधील सप्तलिंगी नदीवर रविवारी ही घटना घडली. अजय अशोक कांबळे (३५) असे बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
देवरुख पोलिस स्थानकात याबाबतची खबर अजयचा भाऊ आशुतोष कांबळे यांनी दिली आहे. आपला भाऊ अजय पत्नीसोबत देवरहाट सप्तलिंगी नदी या ठिकाणी कपडे धुण्याकरता गेला होता. यावेळी त्यांना नदीपलीकडे पारोशीची भाजी दिसली. ती आणण्याकरिता अजयने पाण्यात उडी मारली परंतु त्याला पोहता येत नसल्याने तो पाण्यात गटांगळ्या खाऊ लागला.
हा प्रकार बघून तत्काळ अजयची पत्नी घरी सांगण्यासाठी गेली. त्यानंतर आशुतोष कांबळे यांनी तेथे जाऊन पाहिले असता अजय कुठेही दिसला नाही. तोपर्यंतही ग्रामस्थही तेथे गोळा झाले. त्यांनी अजयचा पाण्यात शोध घेतला. मात्र, तो सापडला नाही. अजयचा शोध घेण्यासाठी रमेश सावंत व त्यांच्या पथकातील लोकांना तेथे बोलावण्यात आले. या पथकातील लोकांनी कसून शोध घेतला असला त्यांना अजय पाण्यातच सापडला.
मात्र, अजयची कोणतीही हालचाल होत नव्हती. त्याला लगेचच ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप माने यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. देवरुखचे पोलिस निरीक्षक उदय झावरे, उपनिरीक्षक नामदेव जाधव, हेडकॉन्स्टेबल अभिजीत वेलवणकर, कॉन्स्टेबल नितीन भोंडवे, सुहास लाड, सचिन लगारे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.
कुटुंबाचा कर्ता हरपला
अजय मजुरी करून आपले कुटुंब चालवत होता. त्याच्या जाण्याने कुटुंबाचा कर्ता हरपला आहे. आधारच हरपल्याने कुटुंब पोरके झाले आहे. अजयच्या पश्चात पत्नी, पाच वर्षांचा मुलगा असा परिवार आहे. अजयवर सोमवारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.