‘वर्क फ्रॉम होम’चे आमिष; संगमेश्वरातील महिलेला सव्वा दोन लाखांचा गंडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 13:45 IST2025-07-05T13:44:57+5:302025-07-05T13:45:18+5:30
देवरुख : ‘वर्क फ्राॅम हाेम’चे आमिष दाखवून संगमेश्वर तालुक्यातील गाेळवली - बाैद्धवाडी येथील एका महिलेला तब्बल २ लाख २९ ...

‘वर्क फ्रॉम होम’चे आमिष; संगमेश्वरातील महिलेला सव्वा दोन लाखांचा गंडा
देवरुख : ‘वर्क फ्राॅम हाेम’चे आमिष दाखवून संगमेश्वर तालुक्यातील गाेळवली - बाैद्धवाडी येथील एका महिलेला तब्बल २ लाख २९ हजार १३२ रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी संगमेश्वर पोलिस स्थानकात चाैघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नीता प्रेमदास गमरे (वय ४६) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार, ही घटना २३ जून २०२५ ते २९ जून २०२५ या कालावधीत घडली आहे. नीता गमरे यांना साेशल मीडियावर ‘वंशिका’ नावाच्या अकाऊंटवरून ‘वर्क फ्रॉम होम’ करण्याबाबत मेसेज आला होता. त्यांनी या ऑफरला होकार दिल्यानंतर, ‘कस्टमर सपाेर्ट’ नावाच्या ग्रुपमधील हीना, निखिल पाटील (ओनर), विघ्नेश (ॲडमिन) आणि टाटा क्लिक कंपनीचे सीनियर प्रमोटर सुमित यांनी त्यांना वेळोवेळी विविध टास्क पूर्ण करण्यास सांगितले. हे टास्क पूर्ण करण्यासाठी आणि पुढील टास्कसाठी आगाऊ रक्कम भरण्यासही त्यांना सांगण्यात आले.
फिर्यादी गमरे यांनी त्यांच्या बँक खात्यातून एकूण २ लाख २९ हजार १३२ रुपये वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये भरले. मात्र, पैसे भरल्यानंतरही त्यांना त्यांची रक्कम परत मिळाली नाही. उलट, संशयितांनी त्यांना दिलेले पैसे परत मिळवण्यासाठी आणखी पैसे भरण्याचा आग्रह केला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिस स्थानकात धाव घेतली. याप्रकरणी पाेलिसांनी भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ च्या कलम ३१८ (४), ३१९ (२) आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम ६६ (ड) नुसार चाैघांवर गुन्हा दाखल केला आहे.