‘टीडब्ल्यूजे’च्या संचालकाच्या शोधात चार जिल्ह्यातील पोलिस, संचालकांचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने उडाली खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 16:57 IST2025-12-15T16:56:46+5:302025-12-15T16:57:10+5:30
पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांची माहिती

संग्रहित छाया
चिपळूण : ‘टीडब्ल्यूजे’ संस्थेत राज्यातील शेकडाे पाेलिसांनी गुंतवणूक केल्याचा संचालकांचा एक व्हिडिओ साेशल मीडियावर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. मात्र, हा व्हिडीओ जुना असल्याचे रत्नागिरीचे पाेलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी ‘लाेकमत’ला सांगितले. तसेच संस्थेचा संचालक समीर नार्वेकर याच्या शाेधात चार जिल्ह्यातील पाेलिस असून, लवकरच ताे पाेलिसांच्या हाती लागेल, असेही पाेलिस अधीक्षक बगाटे यांनी सांगितले.
टीडब्लूजे या संस्थेने चिपळूणमध्ये हायटेक कार्यालय उभारून सुरुवातीला लोकांना भुलभुलैय्या दाखवला. या कंपनीत गुंतवणूक केल्यानंतर दामदुप्पट परतावा तसेच गुंतवणुकीचे अनेक फायदे दाखवून गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याचे काम केले. सुरुवातीला काही गुंतवणूकदारांना ठरल्याप्रमाणे लाभही देण्यात आला. त्यामुळे अल्पावधीत ‘टीडब्ल्यूजे’ चिपळूणमध्ये लोकप्रिय ठरू लागली.
परंतु, अचानक गुंतवणूकदारांना लाभ मिळण्यास उशीर होऊ लागला. संचालक सतत संपर्काच्या बाहेर राहिला. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे गुंतवणूकदारांच्या लक्षात आले आणि पोलिस स्थानकात फिर्याद दाखल होऊ लागल्या. काही दिवसांपूर्वी चिपळूण पोलिस स्थानकावर गुंतवणूकदारांनी धडक देत, संताप व्यक्त करत आत्मदहन करण्याचा इशाराही दिला आहे. त्यानंतर साेशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे खळबळ उडाली आहे.
दरम्यान, याबाबत पाेलिस अधीक्षक नितीन बगाटे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हा व्हिडीओ फार जुना असल्याचे सांगितले. या व्हिडीओबाबत आपण खातरजमा केल्याचेही त्यांनी सांगितले. त्याच्या शाेधात चार जिल्ह्यांतील पाेलिस आहेत. लवकरच ताे पाेलिसांच्या तावडीत सापडेल, असेही त्यांनी सांगितले. ताे अन्यत्र गेल्याचा संशय असून, त्या दृष्टीने शाेध घेतला जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
काय म्हटलंय व्हिडीओमध्ये
संचालकाचा एक व्हिडीओ साेशल मीडियावर जाेरदार व्हायरल झाला आहे. यामध्ये संचालकाने टीडब्ल्यूजेमध्ये एकूण ११ हजार गुंतवणूकदार असून, त्यांपैकी राज्यातील शेकडो पोलिस असल्याचे म्हटले आहे. चिपळूण पोलिस स्थानकातील बहुतांश पोलिस कर्मचारीही आपले गुंतवणूकदार असल्याचेही म्हटले आहे.