ट्रकला दुचाकीची जोराची धडक, तळवडेच्या महिलेचा जागीच मृत्यू
By अरुण आडिवरेकर | Updated: April 28, 2023 16:53 IST2023-04-28T16:53:42+5:302023-04-28T16:53:57+5:30
दुचाकीस्वार गंभीर जखमी

ट्रकला दुचाकीची जोराची धडक, तळवडेच्या महिलेचा जागीच मृत्यू
राजापूर/पाचल : समाेरून येणाऱ्या ट्रकला दुचाकीने दिलेल्या जाेरदार धडकेत तळवडे-आंबेवाडी (ता. राजापूर) येथील महिलेचा जागीच मृत्यू झाला. मीनाक्षी मंगेश कलमस्टे (३०) असे महिलेचे नाव आहे. हा अपघात काल, गुरुवारी (दि-२७) ओणी-पाचल मार्गावर झाला.
मीनाक्षी कलमस्टे ही महिला एसटी बसने सकाळी ८ वाजता लांजा येथे दवाखान्यात गेली होती. दवाखान्यात औषधोपचार झाल्यानंतर वडापने ती ओणी येथे आली. ओणी येथून ती ओळखीच्या असलेल्या गणेश धाेंडू गुरव (३६, रा. कार्जिडा, राजापूर) यांच्या दुचाकी (एमएच ०४, ईए ४२०१) वरून ती तळवडे येथे येत होती. ओणी-पाचल मार्गावरील माैजे येळवण येथील बागवेवाडी बस थांब्यादरम्यान समोरून येणाऱ्या ट्रकला दुचाकीची धडक बसली.
ही धडक इतकी जाेरदार हाेती की, महिला दुचाकीवरुन पडल्याने जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीस्वार गणेश गुरव याच्या हाताला व डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्याला रत्नागिरी येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या अपघाताची माहिती मिळताच रायपाटण येथील पोलिसांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली. या अपघाताचा पंचनामा करण्यात आला असून, कमलाकर पाटील, नीलेश कोत्रे, भीम कोळी या घटनेचा अधिक तपास करीत आहेत. याप्रकरणी दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.