रत्नागिरीत टर्की अमली पदार्थासह अट्टल गुन्हेगाराला अटक, ३४ हजाराचा मुद्देमाल जप्त
By अरुण आडिवरेकर | Updated: June 27, 2023 18:28 IST2023-06-27T18:28:14+5:302023-06-27T18:28:37+5:30
शहरातील मच्छिमार्केट परिसरात करण्यात आली कारवाई

रत्नागिरीत टर्की अमली पदार्थासह अट्टल गुन्हेगाराला अटक, ३४ हजाराचा मुद्देमाल जप्त
रत्नागिरी : टर्की अमली पदार्थ विक्रीसाठी आपल्या जवळ बाळगणाऱ्या एका अट्टल गुन्हेगाराला रत्नागिरी शहर पाेलिसांनी रविवारी (दि-२५) रात्री अटक केली. अश्रफ उर्फ अडऱ्या महमूद शेख असे त्याचे नाव आहे. ही कारवाई शहरातील मच्छिमार्केट परिसरात करण्यात आली. त्याच्याकडून १६,८०० रुपयाचा १.७३ ग्रॅमचा अमली पदार्थ जप्त करण्यात आला.
रत्नागिरी शहरातील मच्छिमार्केट येथील खान कॉम्प्लेक्स येथे गैरकायदा अमली पदार्थाची विक्री होत असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, शहर पोलिसांनी त्याठिकाणी धाड टाकली. या धाडीत अश्रफ शेखला अटक केली. त्याच्याकडून १६,८०० रुपयांचा टर्की हा अमली पदार्थ जप्त करण्यात आला. तसेच रोख १२,५३० रुपये आणि ५ हजार रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण ३४,३३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.
पाेलिसांनी अटक केलेल्या अश्रफ उर्फ अडऱ्या महमूद शेख याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. अट्टल गुन्हेगार म्हणून त्याची पाेलिसात नाेंद आहे.