Ratnagiri: बागेत लावलेल्या जाळीमध्ये चिखलात खवले मांजर अडकले, वन विभागाने केली सुखरूप सुटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 13:58 IST2025-07-22T13:57:05+5:302025-07-22T13:58:29+5:30
तपासणी करून ते सुस्थितीत असल्याने त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले

Ratnagiri: बागेत लावलेल्या जाळीमध्ये चिखलात खवले मांजर अडकले, वन विभागाने केली सुखरूप सुटका
रत्नागिरी : तालुक्यातील सोमेश्वर मांडवकर वाडी रस्त्यालगत समीर सुभाष भातडे यांच्या आंबा कलम सोमवारी दुपारच्या सुमारास बागेत कुंपणाला लावलेल्या नायलॉनच्या जाळीमध्ये चिखलात अडकलेल्या खवले मांजराला वन विभागाने तातडीने मोकळे करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडले.
समीर भातडे यांच्या आंबा कलम बागेत सोमवारी दुपारच्या सुमारास कुंपणाला लावलेल्या नायलॉनच्या जाळीमध्ये खवले मांजर अडकल्याची माहिती निसर्गप्रेमी व वन्यप्राणी प्रेमी रोहन वारेकर यांना मिळाली. त्यांनी तत्काळ वनविभागाला ही माहिती देताच वन विभागाचे पथक जागेवर दाखल झाले.
चिखलामध्ये आणि नायलॉन जाळ्यामध्ये अडकलेल्या खवले मांजराची सुखरूप सुटका करून रत्नागिरीच्या पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडून तपासणी करून घेतली. ते सुस्थितीत असल्याने त्याला सायंकाळी नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
यावेळी पालीचे वनपाल न्हानू गावडे, जाकादेवीच्या वनरक्षक शर्वरी कदम, प्राणी प्रेमी महेश धोत्रे यांनी रत्नागिरीच्या विभागीय वन अधिकारी (चिपळूण) गिरिजा देसाई तसेच सहाय्यक वनसंरक्षक प्रियंका लगड तसेच रत्नागिरी परिक्षेत्राचे वन अधिकारी प्रकाश सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली खवले मांजराला जीवदान देण्याची कामगिरी केली.
अशा प्रकारच्या घटना घडल्यास किंवा वन्य प्राणी अडचणीत सापडल्यास वन विभागाचा टोल फ्री क्रमांक १९२६ किंवा ९४२१७४१३३५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन वन विभागाच्या वतीने विभागीय वनाधिकारी गिरीजा देसाई यांनी केले आहे.