मुंबई-गोवा महामार्गावरील ब्लॅक स्पॉटसह अन्य कामांसाठी केंद्राकडे २०० कोटींचा प्रस्ताव पाठविणार - मंत्री भोसले
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 16:59 IST2025-08-09T16:58:47+5:302025-08-09T16:59:12+5:30
डिसेंबर २०२५ला रस्ता नीट असेल

मुंबई-गोवा महामार्गावरील ब्लॅक स्पॉटसह अन्य कामांसाठी केंद्राकडे २०० कोटींचा प्रस्ताव पाठविणार - मंत्री भोसले
रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील सातत्याने अपघात होणारी ठिकाणे, सर्व्हिस रोड, पुलाखालील रस्ते, उड्डाणपूल अशा विविध कामांसाठी आणखी २०० कोटी रुपयांची गरज असून, तसा प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून तयार केला जात आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर हा प्रस्ताव ठेवला जाणार असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांनी रत्नागिरीतील पत्रकार परिषदेमध्ये दिली.
गुरुवार, ७ ऑगस्ट रोजी पनवेल येथून मंत्री भोसले यांनी मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी सुरू केली. सायंकाळी उशिरा ते जिल्ह्यात दाखल झाले. कशेडी बोगद्याची पाहणी करून ते रत्नागिरीत आले. शुक्रवारी सकाळी त्यांनी राष्ट्रीय महामार्ग तसेच सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी कामाचा आढावा घेतला.
गणेशोत्सवाला बहुसंख्य चाकरमानी जिल्ह्यात येतात. अशावेळी लोकांना वाहतूक सुरळीत ठेवणे, काही ठिकाणी रस्त्याची दुरुस्ती करणे, पर्यायी रस्ते सुस्थितीत ठेवणे, भूसंपादन, महामार्गावर जिल्ह्यात १० ठिकाणी सुविधा केंद्र उभारणे, याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा झाली. संगमेश्वर येथील रस्त्याच्या कामाकडे ठेकेदाराने गांभीर्याने लक्ष न दिल्यास ठेकेदार बदलावा लागेल, असे ठेकेदाराला स्पष्ट शब्दात सुनावल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. भूसंपादन कामामध्ये पैशांची अडचण येणार नाही, ते पैसे राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे उपलब्ध आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
कामामध्ये दर्जा राखणे आवश्यकच आहे. त्यासाठी कोणालाही पाठीशी घालणार नाही. दोषी असल्यास ठेकेदार तसेच अधिकाऱ्यांवरही कारवाई करणार, अशी भूमिका त्यांनी मांडली. चिपळूण येथील उड्डाणपुलाचे डिझाइन बदलले आहे. त्या ठेकेदाराला एकही रुपया न देता तो ठेकेदारच त्यावर स्वत: खर्च करत आहे. काही ठिकाणच्या सर्व्हिस रोडचा दर्जा खराब असून, तो रस्ता दुरुस्त करून देण्याची जबाबदारी संबंधित ठेकेदाराची असल्याचेही त्यांनी सांगितले.
गेल्या दीड वर्षात सरकार सत्तेवर आल्यावर राज्यातील ठेकेदारांची साडेनऊ हजार कोटींची देणी देण्यात आली आहेत. त्यामध्ये कोकणही आहे. उरलेले पैसे पुढील काही दिवसांतच ठेकेदारांना देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
डिसेंबर २०२५ला रस्ता नीट असेल
अनेक ठिकाणचे रस्त्याचे, पुलांचे, उड्डाणपुलाचे, सर्व्हिस रोडचे काम बाकी आहे. ही कामे येत्या डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येतील आणि जिल्ह्यातील महामार्गाचे काम डिसेंबर २०२५ अखेरपर्यंत पूर्ण होईल, असा दावा त्यांनी यावेळी केला.