संतापजनक! गर्भवती महिलेला बेदम मारहाण, अर्भक दगावले; सहा जणांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2022 16:39 IST2022-08-02T16:38:39+5:302022-08-02T16:39:03+5:30
ती सहा महिन्यांची गर्भवती असल्याने तिला मारहाणीचा त्रास होऊ लागला. अन् अर्भकाचा मृत्यू झाला.

संतापजनक! गर्भवती महिलेला बेदम मारहाण, अर्भक दगावले; सहा जणांवर गुन्हा दाखल
मंडणगड : गर्भवती महिलेला बेदम मारहाण केल्याने तिचे सहा महिन्यांचे अर्भक दगावल्याची घटना मंडणगड तालुक्यातील म्हाप्रळ येथे १ ऑगस्ट राेजी सकाळी ५.१५ वाजता घडली. या प्रकरणी मंडणगड पाेलीस स्थानकात सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी मरियम डावरे (३४, रा. नवानगर, म्हाप्रळ मोहल्ला) यांनी मंडणगड पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली आहे. म्हाप्रळ येथील फुरकान मुकादम, त्याची आई (नाव माहीत नाही), जहूर मुकादम, हसमत काजी, फैजान मुकादम, अब्बास मुकादम या सहा जणांनी मरियम डावरे हिला २३ जुलै रोजी बेदम मारहाण केली. या सहा जणांनी मरियम हिच्या पाेटावरही मारहाण केली हाेती.
ती सहा महिन्यांची गर्भवती असल्याने तिला मारहाणीचा त्रास होऊ लागला. त्यामुळे तिला रत्नागिरीतील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले हाेते. त्या ठिकाणी तिच्यावर उपचार सुरू असताना साेमवारी (१ ऑगस्ट) सकाळी अर्भकाचा मृत्यू झाला.
या प्रकरणी मंडणगड पाेलीस स्थानकात फिर्याद दाखल केल्यानंतर सहा जणांविराेधात भारतीय दंड विधान कलम १४१, १४३, १४९, ३१५, ३१६, ५०४, ५०६, ३५४ (ड)नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक शैलजा सावंत करीत आहेत.